दिवाळी संपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग येणार असून, बुधवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षांच्या बैठका होत आहेत. भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी फेरनिवड केली जाईल.

भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या बुधवारी दुपारी १ वाजता विधान भवनातील पक्षाच्या कार्यालयात होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी फेरनिवड केली जाईल. भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविली होती. तसेच फडणवीस यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी निवड केली जाईल, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही जाहीर केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले आहेत.

फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यावर सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू होतील. शिवसेनेने सत्तेत समान वाटय़ासाठी आग्रह धरला असला तरी मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा आग्रह असला तरी उभयतांमध्ये ५० आमदारांचा फरक आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदाची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही, असेही भाजपमधून स्पष्ट करण्यात आले. २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे दोन आमदार जास्त निवडून येऊनही पाच वर्षे मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे होते याकडे भाजपचे धुरीण लक्ष वेधतात. प्रसंगी वेगळा निर्णय घेण्याचा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असला तरी केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शिवसेना तेवढी हिंमत दाखविण्याची शक्यता दिसत नाही. त्यातच आम्ही विरोधातच बसू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या दबावतंत्रावर मात करण्यासाठी अपक्षांची जमवाजमव

शिवसेनेचे दबावाचे राजकारण लक्षात घेता, अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांना बरोबर घेण्यावर भाजपने जोर दिला आहे. १३ अपक्षांपैकी १० तरी भाजपबरोबर येतील, असे सांगण्यात येते. याशिवाय छोटय़ा पक्षांशी भाजपने संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह त्या त्या विभागातील नेतेमंडळी अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहेत. १५ आमदारांनी पाठिंब्याची तयारी दर्शविल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकालानंतर लगेचच जाहीर केले होते. भाजपची ही चाल लक्षात घेऊनच शिवसेनेने विदर्भातील दोन्ही बंडखोर आमदारांना आपल्याबरोबर घेतले आहे. यासाठी शिवसेना नेते अनिल देसाई यांनी या दोन आमदारांना नागपूरला येऊन मुंबईला बरोबर नेले.