नर्सरी प्रवेश : वयाची अंमलबजावणी लांबणीवर

प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावरच नर्सरीच्या प्रवेशाकरिता तीन वर्षे वयाची अट घालणाऱ्या नियमाची अंमलबजावणी २०१६-१७पर्यंत पुढे ढकलून राज्य सरकारने पालकांना दिलासा दिला आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावरच नर्सरीच्या प्रवेशाकरिता तीन वर्षे वयाची अट घालणाऱ्या नियमाची अंमलबजावणी  २०१६-१७पर्यंत पुढे ढकलून राज्य सरकारने पालकांना दिलासा दिला आहे. नर्सरीबरोबरच इयत्ता पहिलीकरिता टप्प्याटप्प्याने करण्यात येणारी सहा वर्षे वयाच्या अटीची अंमलबजावणीही एक वर्षांने पुढे ढकलण्यात आली आहे.
इयत्ता पहिलीकरिता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षांने वाढविण्याबरोबरच पूर्व प्राथमिक वर्गाकरिताही बालकाचे किमान वय निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने २१ जानेवारीला घेतला. यानुसार नर्सरीला तीन वर्षे पूर्ण केलेल्या बालकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर पहिलीसाठी ही अट सहा असणार आहे. वयाची मर्यादा वाढविल्याने गोंधळ टाळण्यासाठी इयत्ता पहिलीकरिता वयाची अट टप्प्याटप्प्याने वाढविली जाणार होती. त्यामुळे, शाळांना २०१५-१६चे पहिलीचे प्रवेश जुन्या वयोमर्यादेनुसार म्हणजेच पाच वर्षे पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेशपात्र ठरवून राबविता येणार आहेत.
नर्सरीबाबत मात्र वयाच्या अटीचे याच म्हणजे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून पालन करण्यात यावे, असे या आदेशात स्पष्ट म्हटले होते. नेमकी हीच बाब शाळा प्रवेशांमध्ये गोंधळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरली होती. अनेक शाळांनी जुन्या नियमांप्रमाणेच ‘प्लेग्रुप-नर्सरी’पासून शिशुवर्ग-बालवर्गाचेही (ज्यु. केजी, सीनिअर केजी) प्रवेश निश्चित केले आहेत. त्यांना राज्य सरकार संरक्षण देणार का, असा प्रश्न होता. परंतु, १ जानेवारीनंतर घेण्यात आलेले निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून लागू होतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Age implementation prolong in nursery admission

ताज्या बातम्या