मुंबई : आक्रमक हिंदू राष्ट्रवाद आणि व्यापक खाजगीकरण हे श्रमिकांचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे ठाम मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. हिंदू राष्ट्रवाद हा भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधात असून त्यात दलितांना काहीही स्थान नाही. सद्यस्थितीत आक्रमक हिंदू राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात फोफावत असून येत्या ८ – १० वर्षात त्याला आणखी जहाल स्वरूप प्राप्त होईल, असेही त्यांनी नमूद केले. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ. भालचंद्र मुणगेकर लिखित मौलिक आंबेडकर या पुस्तकाचे मंगळवारी एनसीपीए येथे प्रकाशन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी बावीस खंडात लिखाण केले असून त्यातील भारतीय राज्यघटनेची निर्मिती, स्त्रियांची मुक्ती, भारताचे शैक्षणिक धोरण, फाळणी आदी विविध विषयांवरील निवडक उतारे या पुस्तकात संपादित करण्यात आले आहेत. प्रकाशनादरम्यान, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक दीपक पवार यांनी मुणगेकरांची मुलाखत घेतली.

देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली असली तरी जातीयवाद कमी झालेला नाही. आंतरजातीय विवाह केल्यामुळे ऑनर किलिंगसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. केवळ प्रेम केल्यामुळे हत्या करणारा भारतासारखा मुर्दाड देश जगभरात कुठेही नाही, अशी टिपण्णी त्यांनी केली. तसेच, आता समाजातील नैतिकता ढासळत चालली आहे. समाजात बदल, परिवर्तन होण्यासाठी लोकांमध्ये संवेदनशीलता असायला हवी. आजच्या भ्रामक बुद्धिवाद्यांना सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता वाटत नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.जाणिवा स्पष्ट होण्याच्या वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख पटली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्य भारतीयांसह मराठी समाजानेही कायमच अन्याय केला आहे. आसपास मोठी माणसे बघायची सवय नसल्याने महाराष्ट्राच्या मातीत एवढा मोठा प्रकांड पंडित होऊन गेल्याची लोकांना कल्पनाच नाही. संपूर्ण देशाच्या हितासाठी केलेल्या कार्यानंतरही त्यांना विशिष्ट जाती- धर्म, समाजापुरते मर्यादित ठेवणे हा सामाजिक अपमान असून महाराष्ट्र हा अपमान सातत्याने करत आलेला आहे, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

लहानपणी डॉ. आंबेडकर हे पॉप्युलर प्रकाशनची पुस्तके विकत घ्यायला येत असत. त्यावेळी त्यांना जवळून पाहिले होते. त्यांनतर, एल्फिन्स्टन महाविद्यालयात बाबासाहेब प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी मिळाली होती. त्यांनतर कधीही आंबेडकरांशी वैयक्तिक संपर्क आला नाही. वयाच्या सत्तरीमध्ये पीएचडी करण्याचा निर्णय घेतल्यांनंतर गांधी, सावरकर, आंबेडकर यांच्यावर प्रबंध लिहिला. मात्र, त्यावेळी आंबेडकरांचा गांधी विरोधक यांच्या भूमिकेतून विचार केल्यामुळे आंबेडकर कधी समजलेच नाहीत, अशी खंत पॉप्युलर प्रकाशनचे डॉ. रामदास भटकळ यांनी व्यक्त केली.

या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र एकता अभियानाचे मिलिंद तुळसकर, एनसीपीएच्या डॉ. सुजाता जाधव, बोध गयाचे कुणाल रेगे, पॉप्युलर प्रकाशनच्या संपादिका अस्मिता मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाही टिकवण्याचे आव्हान…

स्वातंत्र्यपूर्व काळात देशात लोकशाहीला पूरक असे वातावरण नव्हते. येथे लोकशाही ओढत ताणत आणली गेली. ब्रिटिश देशात आले नसते तर देशाने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला नसता. मात्र, आज लोकशाही धोक्यात आली आहे. घटनात्मक नीतिमत्तेचा आता देशाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. पक्षांतराच्या कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असून राजकीय पक्षांची चुकीच्या पद्धतीने फाटाफूट होत आहे. या परिस्थितीत लोकशाही टिकवून ठेवणे अत्यंत आव्हानात्मक आहे. लोकशाही बळकट करण्याऐवजी तिला कमकुवत केले जात आहे. असे असले तरीही लोकशाही सुदृढ करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न निवडक वर्तमानपत्रातून केले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीवर भाष्य करणारी माध्यमे कमी झाली आहेत, असेही मुणगेकर यांनी सांगितले.