मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन नव्हते. हे भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत वेळेचे बंधन न पाळता १३५ मशिदींवर अजान देण्यात आली त्या मशिदींच्या मुल्ला – मौलवींच्या विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.  मशिदींवरील भोंगे हटविले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण बुधवारी करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यानुसार पोलिसांनी राज्यभर खबरदारीचे उपाय योजले होते तसेच मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आमचे आंदोलन एक दिवसाचे नाही. आंदोलन संपलेले नाही. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आंदोलन सुरूच राहील, असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  मनसेच्या आंदोलनामुळे पोलिसांनी मुंबईतील सर्व मशिदींच्या मुल्ला-मौलवींशी चर्चा करून नियमांचे पालन करा, असे बजाविले होते. तसे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला कळविले होते. मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये सकाळी पाचच्या आत बांग देण्यात आली. या १३५ मशिदींच्या मुल्ला-मौलवींच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करताना ठाकरे म्हणाले, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग केला नसतानाही अटक करण्यात येत आहे वा त्यांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत. मुंबईतील १३५ मशिदींच्या मौलवींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. मग त्यांच्या विरोधात कारवाई का नाही, असा सवालही ठाकरे यांनी केला. मुंबईतील बहुसंख्य मशिदी या अनधिकृत आहेत. या अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी देता, असा सवाल ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना केला. नियमांचा भंग करून अजान देणाऱ्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा, असा आदेशही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation till horns fall mosques raj thackeray warning mosques bells movement ysh
First published on: 05-05-2022 at 02:03 IST