करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील वाद विकोपास गेलेला असताना राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड १९’ असा उल्लेख करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भातील एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोविडचा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी दिली.

करोनामुळे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही विद्यापीठांमध्ये केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात आल्या असून कृषी पदविका (दोन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे द्वितीय वर्षांत प्रवेश देण्यात आला आहे. कृषी तंत्रनिकेतन (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे पुढील वर्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ अशी नोंद करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचे कोणतेही आदेश नसताना विद्यापीठाने परस्पर घेतलेल्या या निर्णयाची सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. गुणपत्रिकांवर हा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

जोरदार टीका..

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘करोना उत्तीर्ण’ असे शिक्के  मारण्यात आल्याने माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारचा सगळा ‘ढ कारभार’ असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. आता कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर हे शिक्के मारले गेल्याने शेलार म्हणाले, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, हेच आम्ही सांगत होतो. पण आम्ही सूचना केल्या की अंगाला सुया टोचतात.

झाले काय?

कृषी तंत्रनिकेतन (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची यंदा परीक्षा न घेता त्यांना पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र ते करताना त्यांच्या गुणपत्रिकांवर ‘प्रमोटेड कोविड १९’ असा शेरा देण्यात आला. या शेऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली, तर विद्यापीठांनी असा शेरा दिल्याबद्दल सरकारने चौकशीचे आदेश दिले.

ज्या विद्यार्थ्यांना कोविडचा शेरा मारलेली गुणपत्रिका देण्यात आली आहे, ती परत घेऊन नव्याने गुणपत्रिका देण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांला कोविडचा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका दिल्या जाणार नाहीत.

– दादाजी भुसे, कृषी मंत्री

(प्रातिनिधिक छायाचित्र)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural university students this year promoted covid 19 dissatisfied with the mention on the mark sheet abn
First published on: 15-07-2020 at 00:12 IST