मुंबई : शेतीची उत्पादकता वाढावी. शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा, यासाठी शेत मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन सकारात्मक आहे, लवकरत ठोस पाऊले उचलणार आहोत. कमी मनुष्यबळात काम करणे, मानवविरहित यंत्राचा वापर करणे, कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन विविध कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवत आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाला दिली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्तालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सुरज मांढरे, संचालक रफिक नायकवडी, सुनिल बोरकर, विनयकुमार आवटे, डॉ. के. पी. मोते, शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सदस्य बीडचे नाथराव कराड, परभणीचे सदाशिव थोरात, कोल्हापूरचे सर्जेराव पाटील, साताऱ्याचे विश्वंभर बाबर, राजेद्र गायकवाड, वाशिमचे रविंद्र गायकवाड, कर्जतचे पांडुरंग डोंगरे, ठाण्यातील बबन हरणे, नागपूरचे आत्मास्वामी खोपडे, जळगावचे प्रवीण पाटील – फरंकाडे आदी पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.
कृषी विषयक समित्यावर शासन निर्णय घेऊन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सदस्य म्हणून घेण्यात येईल. शेतीविषयक कामांसाठी योग्य ते धोरण ठरविण्यात येईल. शासनाकडे या बाबत सविस्तर प्रस्ताव सादर करू, पीक विमा योजनेत सुधारणा करणे, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांना सक्षम करत आहोत. नवीन पिकाचे संशोधन दिले जात आहे. जमिनीची सुपीकता वाढवून पिकाची उत्पादकता वाढविणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासन व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत काही सूचना असतील तर त्यावरती जरूर विचार करू. शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ नक्कीच चांगल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करेल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून पिकाची उत्पादकता वाढवणे, कृषी विषयक प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना ग्रामपंचायतीची कर आकारणी रद्द करणे या बाबत नक्कीच कार्यवाही करू, अशी ग्वाहीही कोकाटे यांनी दिली.
कृषीविषयक १६ विषयांवर चर्चा
कृषीमंत्री कोकाटे यांनी राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली. राज्यातील शेतीविषयक १६ विषयांवर चर्चा केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले, अशी माहिती शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषिभूषण प्रकाश पाटील यांनी दिली.