मुंबई : शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत असणार आहे. राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय काढून ही घोषणा केली आहे. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना देवस्थानच्या प्रशासनात विविध प्रकारच्या अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. बनावट भ्रमणध्वनी अॅप्स तयार करून आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले होते. आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि देवस्थानातील हिंदू व मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेले वैमनस्य आणि श्री शनि देवाच्या चौथऱ्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देवस्थानच्या उप कार्यकारी अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. या बाबी गंभीर घटना निदर्शनास आल्यामुळे देवस्थानच्या कार्यप्रणालीबाबत भाविकांमध्ये अस्वस्थता व तीव्र रोष निर्माण झाला होता. भाविकांचा विश्वास कायम राखण्यासाठी, देवस्थानच्या प्रशासनात सुसूत्रता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था कायदा २०१८ मध्ये लागू करण्यात आला आहे. तसेच सरकारच्या पातळीवर श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही समिती स्थापन होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे समिती स्थापन होईपर्यंत आहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत देवस्थानचा विश्वस्त व्यवस्थेचा कारभार सुरळित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालविला जावा. देवस्थानच्या दैनंदिन व्यवहाराचे व्यवस्थापन सुरळित पार पडले जावे. प्रशासकांनी देवस्थान विश्वस्त व्यवस्थेचे संपूर्ण प्रशासन, व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण तसेच भक्तांसाठीच्या सर्व सेवा – सुविधांचे व्यवस्थापन जबाबदारीने पार पाडावे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.
शनि शिंगणापूरला इतके महत्त्व का
शनि शिंगणापूर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे मोकळ्या जागेत एका चौथऱ्यावर श्री शनैश्वर महाराज यांची शिळा आहे. या गावातील घरांना दरवाजे नाहीत. फक्त दाराच्या चौकटी असतात, येथे चोरी होत नाही, अशी श्रद्धा आहे. शनि अमावस्येच्या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी जमते.
माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि उप कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आत्महत्येची घटना घडली होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही मंदिर व्यवस्थापन समितीच्या भ्रष्टाचारवरून चर्चा झाली होती. त्यानंतर सरकारने चौकशीची घोषणा केली होती.