मुंबई : लंडन येथे स्थायिक असलेल्या जावेद अली सय्यद (३७) यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला. जावेद हे मूळचे मालाडच्या ईराणी वाडी येथे राहणारे. या घटनेमुळे ईराणी वाडी परिसरात शोककळा पसरली आहे. जावेद यांची आई फरिदा सय्यद यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत अपघाचाची माहिती देण्यात आली नव्हती. तर जावेद यांचे भाऊ आणि काही नातलग अहमदाबादला असून, त्यांचे ‘डीएनए’ नमुन घेण्यात आले आहेत.
जावेद यांना एक भाऊ, दोन बहिणी आहेत. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले. जावेद यांची आई फरिदा या मालाडच्या ईराणी वाडीत मोठा मुलगा इम्तियाझ, सून आणि नातवंडांसह राहते. त्यांचे सर्व नातेवाईक याच परिसरात राहतात. एक बहीण विवाहानंतर लंडनला स्थायिक झाली तर एक बहीण याच परिसरात राहते. जावेद शिक्षणानिमित्ताने लंडनला गेले आणि नंतर तेथेच स्थायिक झाले. त्यांनी तेथे मोबाईलचे दुकान सुरू केले होते. त्यांनी लंडनचीच रहिवासी असलेल्या मरियम (३२) यांच्याशी विवाह केला होता. त्यांना अमानी (६) ही मुलगी तर झेन (४) हा मुलगा होता. तेथे त्याने ‘ग्रीन कार्ड’ही घेतले होते, अशी माहिती जावेद यांचा मावस भाऊ साऊद याने दिली.
आईलाही लंडनला नेणार होते, पण…
जावेद ईदसाठी सहकुटुंब मुंबईत आले होते. जावेद त्यांची पत्नी आणि मुलांना घेऊन आल्याने घरात खूप आनंदाचे वातावरण होते. त्यांनी कुटुंबासाठी भरपूर खरेदी केली होती. पुढच्या खेपेला आईलाही लंडनला घेऊन जाणार, असे त्यांनी सांगितले होते. परंतु गुरुवारी दुपारी ही घटना घडल्यापासून आम्ही सर्व सुन्न झालो आहोत. जावेदच्या आईला हृदयविकार असल्याने अद्याप त्यांना काहीच सांगितले नाही, असे साऊद याने सांगितले.