मुंबई : फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील भायखळा, माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा, वरळी येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला. तर वांद्रे कुर्ला संकुल येथे सलग दुसऱ्या दिवशी ३३६ हवा निर्देशांक होता. म्हणजेच येथील हवा ही ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली.
‘समीर’ अॅपच्या नोंदीनुसार सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदला गेला, उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध घातल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी मुंबईकरांनी बंधने झुगारून फटाके उडविले. शहरात सोमवारी दुपारपर्यंत सर्व भागांतील हवा ‘मध्यम’ श्रेणीत होती. त्यानंतर सायंकाळी ६ नंतर अनेक भागांतील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ स्तरावर होती.
भायखळा येथील हवा निर्देशांक सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास २११ इतका म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत नोंदला गेला. त्याचबरोबर देवनार येथे २६७, माझगाव २५५, वरळी २१३, विलेपार्ले २१५, नेव्ही नगर कुलाबा २७९, मालाड २१५, खेरवाडी वांद्रे २०३, चकाला २५४ आणि बोरिवली येथे २२८ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक होता. या सर्व भागातील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे. त्याखालोखाल चेंबूर येथील हवा निर्देशांक १५२, कुलाबा १०६, घाटकोपर १८६, कांदिवली १५५, भांडूप १२७, कुर्ला ११८, शिवडी १३१ आणि शिवाजी नगर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक १४१ इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. संपूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १८५ इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत होता.
आजारांना निमंत्रण
हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना धोका निर्माण होतो. पावसाळ्यापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकला वाढण्याची भीती आहे.
हवेचा दर्जा ढासळलेला असताना काळजी काय घ्यावी?
प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची अॅलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी असे सल्ले तज्ज्ञांनी दिले आहेत.