राज्यात महापुरुषांच्या अपमानावरून राजकीय पारा चढला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीकडून राज्यात महामोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देण्यात आली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिंदे-फडणवीस सरकारने महामोर्चाला परवानगी नाकारल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, “हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने होईल. लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने आपलं मतप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढला जातो तसाच आम्ही मोर्चा काढणार आहोत. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे ज्या सर्व परवानग्या मागायच्या असतात त्या मागितल्या आहेत. अद्याप परवानगी आमच्या हातात आलेली नाही, परंतु नक्की येईल. आम्हाला परवानगी मिळेल याविषयी विश्वास आहे.”

“आम्हाला कोणतीही परवानगी नाकारली गेली नाही”

“आम्हाला कोणतीही परवानगी नाकारली गेली नाही. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमचा मोर्चा निघणार आहे. त्यानुसार मुंबईत एमएमआरडीएच्या भागातून आणि ठाणे, पालघर, नाशिक, पुणे अशा सर्व महाराष्ट्रातून उत्सफुर्तपणे लोक त्यात सहभागी होतील,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“मोर्चाचे विषय कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत”

अजित पवार पुढे म्हणाले, “आमचं महाराष्ट्रातील तमाम जनेतला आवाहन आहे की, ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं आहे त्यांनी सहभागी व्हावं. मोर्चाचे विषय कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. सीमाप्रश्न उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांविषयी जे वक्तव्ये केली जात आहेत हाही सगळ्यांचाच प्रश्न आहे. हा एकट्या कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. बेरोजगारी आणि महागाई हाही सर्वांचाच प्रश्न आहे.”

हेही वाचा : अमित शाहांना ‘बनावट ट्विटर अकाऊंट’चा संशय; अजित पवार म्हणतात, “बोम्मईंनी ते वक्तव्य…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिल्लीतील बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना त्यांच्या ट्वीटमुळे हे सर्व घडल्याचं सांगण्यात आलं. त्यावर ते माझ्याकडून असं काही घडलंच नाही असं म्हटले. त्यावर त्यांच्या ट्विटरचा कोणी गैरवापर केला असेल तर त्यावर कारवाई करा असं सांगण्यात आलं. त्यानंतर बोम्मईंनी बैठकीत तसा फोन केला,” असं अजित पवारांनी नमूद केलं.