मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावीत. महामार्गावरील इंदापूर – माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी लागणाऱ्या २१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देतानाच ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी बैठकीत पवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा उपस्थित होते.
या महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. महामार्गाची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून चौपदीकरणाची कामे, रस्त्यातील खड्ढे भरणे,विविध ठिकाणी माहितीपूर्ण दिशादर्शक फलक लावणे,पूलांची कामे, ट्रामा केअर सेंटर उभारणे, दर चाळीस किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था यासह इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.
रस्त्यातील धोकादायक खड्डे तत्काळ भरण्यासाठी दोन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नागरिकांना या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या.
गणेशोत्सव कालावधीत कोकणवासीय मोठ्याप्रमाणात आपल्या गावी जातात. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने वाहतुकीला अडथळा निर्माण होतील अशी मोठी बांधकामाची कामे थांबवावीत. जिथे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी वाहतूकीचे काटेकोरपणे नियोजन करावे. अवजड वाहने तसेच इतर वाहतुकीचे नियोजन करावे. घाट रस्ते तसेच वळणाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही पवार यांनी दिले.