मुंबई: नगरविकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय अशा विविध खात्यांकडून आमदारांच्या मतदारसंघांतील कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदारांच्या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील आठवडय़ात गटाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे.
महाविकास आघाडी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या कारणासाठी नाराज होते. त्याच कारणामुळे अजित पवार गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडेच वित्त खाते आहे. तरीही अजित पवार गटाचे आमदार नाराज आहेत. या आमदारांनी नगरविकास, सामाजिक न्याय, रोजगार हमी, मृद व जलसंधारण, ग्रामविकास आदी खात्यांचा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीचा सूर लावला असल्याचे समजते. ग्रामीण भागातील आमदारांना मतदारसंघांतील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची आमदारांची तक्रार आहे. यातूनच या आमदारांनी नाराजीचा सूर लावला आहे. गेल्याच आठवडय़ात अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा निधीत डावलले जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात येते. आमदारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर २१ तारखेला होणाऱ्या बैठकीत अजित पवार हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा >>>जो बायडेन यांच्या नातीच्या कारवर हल्ला? सिक्रेट एंजट्सकडून गोळीबार, नेमकं प्रकरण काय?
वडेट्टीवार यांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच नाराज असतात. त्यामुळे त्यांना विविध मागण्यांसाठी नेहमीच दिल्लीवारी करावी लागते. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी दिला होता. त्यावेळी एवढे मिळून देखील ते नाराज होते. मात्र सध्या महायुतीत अर्थखाते त्यांच्याकडे असताना त्यांना निधीसाठी झगडावे लागत आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांवर अथवा त्यांच्या गटावर अन्याय होत असेल असे आपणांस वाटत नाही. निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. कोणत्या आमदाराला किती निधी दिला जात आहे. याबद्दल काही सांगता येत नाही. निधी वाटपाबाबत आजकाल वेगळा पायंडा, प्रथा पडत आहे. प्रत्येकालाच आपल्या मतदार संघात जास्तीत जास्त निधी हवा असल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नोंदविले.
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर ते नाराज असल्याचे जाणवते. मात्र ही नाराजी वेगवेगळय़ा कारणांची असू शकेल. भाजपची प्रथा अशी आहे की इतर पक्षातून नेते घ्यायचे. त्यांना खोटी आश्वासने द्यायची. मात्र त्या लोकनेत्याची ताकद हळूहळू कमी करायची. लोकसभा निवडणूक होईपर्यंत या नाराज आमदारांना वापरून घेतील, असे भाष्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे.