राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जिल्हाधिकारी, कृषी सहाय्यक अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी बदलीचे अधिकार ठराविक आमदारांनाच असल्याचं सांगत बदलीच्या रेटकार्डचे आकडेही सांगितले.

अजित पवार म्हणाले, “माझे अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. ते सांगतात की, आमचा उल्लेख करू नका, पण आम्हाला अधिकार असले, तरी मंत्रालयातून आलेल्या यादीतील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत, असे तोंडी आदेश आहेत. त्यातील काही तर अगदी परदेशातही गेले आहेत. बदल्या होणं, यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे.”

“ठराविक आमदारांनाच बदलीचे अधिकार”

“मागे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही बदलीचं रेटकार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं होतं. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा रेट किती आहे, हे सांगितलं होतं. कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या सांगितल्यावर बदल्या होणार हेही ठरलं आहे. हा अधिकार ठराविक आमदारांनाच दिला आहे. ते पण बदली करायची की नाही यावर चर्चा करतात,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रुपये”

अजित पवार पुढे म्हणाले, “कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रुपये आहे, असं प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलं आहे. लाखो-कोट्यावधी रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसं करू शकतील? शासन आपल्या दारी नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं तरी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय उपयोग नाही. शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नाही.”

हेही वाचा : VIDEO: आर्यन खानप्रकरणी अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्याकडून नको ती कामं करून घेतात”

“जुन्नरचे आमचे आमदार अतुल बेनके येथे बसले आहेत, त्यांनाही विचारा. वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी मोठ्या प्रमाणात नाउमेद झाले आहेत. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना खासगीत विचारावं. अनेक अधिकारी म्हणतात की,आम्हाला महत्त्वाची पोस्टिंग नकोच. आमच्याकडून नको ती कामं करून घेतात. राज्याच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.