राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचाही उल्लेख केला. तसेच मलिकांनी स्पष्ट भूमिका घेतली तेव्हा अनेकांनी त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केल्याचंही नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “आयआरएस अधिकारी व एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र, या प्रकरणाबाबतचे पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सीबीआयला ३ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे ८ जूनला सुनावणी होणार आहे.”




“समीर वानखेडेंवर शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप”
“आर्यन खानप्रकरणात समीर वानखेडेंवर शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप आहे. त्याबाबत सीबीआयनेच उल्लेख केला आहे. याआधी आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टपणे भूमिका मांडण्याचं काम केलं. माध्यमांनीही ती भूमिका दाखवली. परंतु तेव्हा नवाब मलिकांना खोटं ठरवण्याचा, ते जाणीवपूर्वक आरोप करत आहेत आणि तो अधिकारी अत्यंत प्रामाणिक, स्वच्छ आहे असं सांगण्याचा प्रयत्न झाला,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“आता लोकांसमोर सत्य आलं आहे”
“आता मात्र लोकांसमोर सत्य आलं आहे. इतरांनी काही बोलण्याचं कारण नाही, स्वतः सीबीआयच तपास करत आहे. सीबीआयने याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.