मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील सूत्रे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ‘मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी मलिक यांना नेमण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्ष न नेमता समिती नेमली आहे. या समितीमध्ये शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक, झिशान सिद्दीकी, संतोष धुवाळी, भास्कर विचारे, संजय तटकरे, राजू घुगे, महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव यांचा समावेश आहे.

मुंबई बाँबस्फोटातील अरोपींकडून मलिक यांनी कुर्ला येथील जमीन खरेदी केली, असा आरोप महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असताना मलिक यांच्यावर झाला होता. सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून मलिक हे विजनवासात होते. डिसेंबर मधील विधानसभा निवडणुकीत मलिक यांची कन्या सना मलिक यांना पूर्व उपनगरातील अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असताना मलिक यांनी भाजपावर आरोपांची जोरदार राळ उडवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांना पुन्हा मुख् प्रवाहात स्थान दिले आहे. भाजपने नवाब मलिक यांना जोरदार विरोध केलेला होता. अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपच्या महायुतीत असून मुंबईतील निवडणुका महायुती एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मलिक यांच्यासोबत काम करावे लागणार आहे.

सुरज चव्हाण यांना बढती

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना लातूर येथे पत्रकार परिषदेत मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा पक्षाने तातडीने राजीनामा घेतला होता. कारवाईला महिना होण्याच्या पूर्वी पक्षाने चव्हाण यांना प्रदेश सरचिटणी पद देवून बढती दिली आहे. चव्हाण हे पक्ष प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक आहेत.