मुंबई : सेप्सिस हा शब्द अनेकांना फारसा परिचित नसला तरी त्यामागील धोका प्रचंड मोठा आहे. शरीरात झालेल्या संसर्गावर अनियंत्रित प्रतिक्रिया देऊन अंगातील अवयव निकामी होण्याची स्थिती म्हणजे सेप्सिस. न्यूमोनिया, मूत्रमार्गातील संसर्ग, पोटातील संसर्ग, डेंग्यू किंवा मलेरिया यांसारख्या आजारांनंतर सेप्सिस उद्भवू शकतो आणि त्यातून मृत्यूचा धोका दुप्पट वाढतो. १३ सप्टेंबर हा जागतिक सेप्सिस दिन असून यानिमित्त महाराष्ट्रातील आकडेवारीकडे पाहिले असता परिस्थितीचे गंभीर्य स्पष्ट होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२० च्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे पाच कोटी लोकांना सेप्सिस होतो आणि त्यापैकी एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. म्हणजेच जगभरातील एकूण मृत्यूंपैकी जवळपास २० टक्के मृत्यूंना सेप्सिस जबाबदार आहे. भारतातही हे प्रमाण चिंताजनक आहे. आयसीएमआरच्या २०२२ च्या मल्टीसेंटर आयसीयू अभ्यासानुसार देशातील आयसीयूमध्ये दाखल रुग्णांपैकी २५ ते ३० टक्के रुग्णांना सेप्सिसचे निदान होते आणि त्यातील ३५ ते ४० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.

महाराष्ट्रातही हीच स्थिती दिसून येते. राज्य आरोग्य विभागाच्या २०२३ च्या वार्षिक अहवालानुसार मुंबईतील केईएम, सायन व नायर रुग्णालयांत २०२२ मध्ये आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी जवळपास २८ टक्के रुग्णांना सेप्सिसचे निदान झाले. पुणे व नाशिक जिल्हा रुग्णालयांमध्ये हा आकडा २४ ते २६ टक्क्यांदरम्यान होता. ग्रामीण भागात मात्र वेळेवर निदान व उपचार न झाल्याने मृत्युदर ४० टक्क्यांपर्यंत गेला.

सेप्सिस म्हणजे शरीरात झालेल्या संसर्गामुळे (इन्फेक्शनमुळे) रोगप्रतिकारक शक्तीची अतितीव्र प्रतिक्रिया होऊन निर्माण होणारी गंभीर अवस्था होय.आपल्या शरीराला जेव्हा कुठलाही संसर्ग (उदा. फुफ्फुसात, मूत्रमार्गात, रक्तात, पोटात किंवा जखमेमुळे) होतो, तेव्हा त्याविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. पण कधी कधी ही प्रतिक्रिया नियंत्रणाबाहेर जाऊन स्वतःच्याच ऊतकांवर व अवयवांवर हल्ला करू लागते. अशावेळी रक्ताभिसरण, श्वसन, मूत्रपिंड, हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांचे कार्य बिघडू शकते.

नवजात बालक आणि प्रसूतीनंतरच्या महिलांमध्ये सेप्सिसचे प्रमाण विशेष चिंतेचे आहे. एनएफएचएस-५ (२०२०-२१) नुसार महाराष्ट्रातील नवजात मृत्युदर १६ प्रति हजार जन्म इतका आहे. यापैकी जवळपास २३ टक्के मृत्यूंचे कारण नवजात सेप्सिस असल्याचे युनिसेफ-आयसीएमआरच्या २०२१ च्या संयुक्त अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. प्रसूतीनंतर महिलांमध्ये होणाऱ्या संसर्गामुळेही सेप्सिसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

मुंबईतील केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मते सेप्सिस ही ‘सायलेंट किलर’ स्थिती आहे. डेंग्यू, मलेरिया किंवा क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सेप्सिसचे प्रमाण वाढते आहे. वेळेत निदान न झाल्यास आणि उपचार उशिरा मिळाल्यास मृत्यूदर झपाट्याने वाढतो. हा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता, लसीकरण आणि अँटीबायोटिकचा जबाबदारीने वापर हा पहिला टप्पा आहे. रुग्णालयांमध्ये सेप्सिस स्क्रीनिंग प्रोटोकॉल सक्तीचा करणे, जिल्हा रुग्णालयांत आयसीयू व रक्त तपासणी प्रयोगशाळा सक्षम करणे आणि जनजागृती मोहिमा राबवणे ही तातडीची गरज आहे.

जागतिक पातळीवर सेप्सिसला ‘ग्लोबल हेल्थ प्रायोरिटी’ मानले गेले आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येचे घनत्व, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेतील मर्यादा यामुळे सेप्सिसचा धोका आणखी गंभीर ठरत आहे. योग्य वेळेत उपचार आणि प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत तर पुढील काळात सेप्सिस मृत्यूदर राज्यासाठी मोठे सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण करू शकतो.