गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले.
‘हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार’ अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते.
काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली.
अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली.
बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली.
बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.
अमरत्व देणा-या बुटीचे चमत्कार ऐकताना गर्दीचे भान हरपले होते.
‘आता माझ्याकडे बघा… माझं वय किती असेल? ‘… पांढऱ्याशुभ्र दाढीवर आपला सुरकुतलेला हात फिरवत बाबाने गर्दीला सवाल केला.
गर्दी पुरती कह्यात आलीय, याची त्याला खात्री झाली होती.
‘ऐशी’.. गर्दीतला कुणीतरी ओरडला.
‘पंचाण्णू’!… आणखी कोणतरी म्हणाला. मग बाबाचं वय ओळखायची स्पर्धाच लागली. पंचाहत्तरापासून शंभरपर्यंतचे सारे आकडे सांगून झाले.
बाबा गप्पच होता.
काही वेळ शांतता पसरली.
आणि बाबा मंद हसला.
मित्रहो, येत्या एकोणतीस तारखेला माझा सातशे छप्पन्नवा वाढदिवस आहे. तुमच्या गावातच मी तो साजरा करणार आहे, आणि त्याचं सारं श्रेय या जडीबुटीला आहे’… हातातल्या काळपटलेल्या बरणीच्या झाकणावर बोट ठेवत बाबा म्हणाला.
गर्दीचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते.
एकाच्या डोळ्यात मात्र, ठाम अविश्वास भरला होता.
तो बाजूला झाला. बााबाच्या सहकाऱ्याला खूण करून त्याने हळूच बाहेर बोलावले.
‘काय रे, हा बाबा खरं सांगतोय?’… विश्वासात घेतल्याच्या सुरात त्याने बाबाच्या सहकाऱ्याला विचारलं.
बाबाचा सहकारी विचित्र हसला. त्यानं खांदेही उडवले.
आता बाबाचं बिंग फुटणार या कल्पनेने तो आनंदला होता.
बाबाच्या सहकाऱ्यानं एकवार त्याच्याकडे बघितलं.
‘मला खरंच माहीत नाही!’… तो म्हणाला.
क्षणभर शांततेत गेला.
‘मला त्यांच्याकडे नोकरीला लागून दोनशे एकूणचाळीस वर्षच झालीयेत!’… बाबाचा सहकारी सहजपणे म्हणाला.
आता याचेही डोळे विस्फारले होते.
घाईघाईने तो परत गर्दीत मिसळला.
अमरत्वाची जडीबुटी मिळवण्यासाठी सारी गर्दी तुफान हातघाईवर आली होती!…
बाबा मंद हसत पुड्या बांधत होता!!!
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2016 रोजी प्रकाशित
BLOG : अमरबाबा…
अमरत्व देणार-या बुटीचे चमत्कार ऐकताना गर्दीचे भान हरपले होते.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 14-09-2016 at 14:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amarbaba