मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी तांदळाची तस्करी सुरू असून जे. वी. ग्रेन्स डीलर्स या नोंदणीकृत संस्थेकडून हा तांदूळ दक्षिण आफ्रिकेला पाठवून तस्करी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जे. बी. ग्रेन डीलर्सच्या वतीने कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी रेल्वे प्रशासनाने यांचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केले आणि अनामत रक्कम सुद्धा जप्त केली आहे. अशा संस्थेला कोणतेही काम देता येत नाही. मग गुप्ता हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे? असा सवाल करत दानवे यांनी या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. तसेच टेंडर घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दानवे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून तांदूळ घोटाळ्याचाटआरोप केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या संचालक (प्राथमिक) कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ट्रस्टचे अध्यक्ष अनिलकुमार गुप्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी वाटप होणारा तांदूळ परदेशात, विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये तस्करी करत असल्याची खात्रीशीर माहिती असल्याचे दानवे यांनी सांगितले.
जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. मात्र, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेला होणारा नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी गुप्ता हे स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचे समोर आले. संस्थेत ८० टक्के भागधारक असलेले अनिलकुमार गुप्ता हेच तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. यांना हे उपकंत्राट देताना नियम जात्यात दळून टाकण्यात आले, असा आरोप दानवे यांनी केला.