मुंबई : मराठीत जागतिक स्तरावरील साहित्य निर्माण होऊनही आपले साहित्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले नाही. आपल्या गंडामुळे साहित्याला ते स्थान मिळवून देण्यास कमी पडलो. तुच्छतावाद, आपल्याला काय करायचे आहे ही वृत्ती, भाषेला, संस्कृतीला कमी लेखण्याची मानसिकता बाजूला सारून महाराष्ट्राने सांस्कृतिक अवकाश वाढवायला हवा, असे मत ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये बुधवारी व्यक्त केले.

‘कविता आणि शायरी’ या कार्यक्रमात अंबरिश मिश्र यांनी शेर आणि गजलेची पेरणी करत उर्दू भाषेची ओळख करून देत ही मैफल खुलवली. मिर्जा गालिब, मोमिन, मीर तकी आणि दाग देहलवी ही चार मोठी बंदरे आहेत आणि या चौघांच्या खांद्यावर उर्दूची पालखी आहे असे ते यावेळी म्हणाले. उर्दू भाषेचे सौंदर्य रसिकांना सांगतानाच उर्दू भाषेवर पडलेले प्रभाव, बॉलीवूड संगीतात आलेली उर्दू भाषा याची गाणी सादर केली.

ते म्हणाले, विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व. साठच्या दशकात राष्ट्रीय स्तरावर जयंत महापात्रा किंवा सीताकांत महापात्रा यांचे नाव झाले. त्याप्रमाणे विंदांचे नाव का राष्ट्रीय स्तरावर पोहोचले नाही. आपण आपल्या साहित्यिकांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी कमी पडतोय का, असा प्रश्न पडतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिरो आहेत. मात्र जेव्हा तुमचा हिरो राजकारणी पळवतात. तेव्हा हाती काय उरते? आदर्श, भाषा जेव्हा तुमच्या हाती असते तेव्हा सांस्कृतिक समृद्धी वाढते. यावेळी त्यांनी टिळकांच्या एका वाक्याची आठवण करून दिली. ‘मी महाराष्ट्रात जन्माला आला म्हणून मी छत्रपतींची जयंती साजरी करतो. जर मी उत्तरेत जन्माला आलो असतो तर मी अकबराची जयंती साजरी केली असती.’ अलीकडे आपण सगळ्याच गोष्टी जात आणि धर्मावर घेऊन जातो. संस्कृतीची वाटणी करतो, असेही ते म्हणाले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मिश्र यांच्याशी संवाद साधला, तर ‘कौटिल्य’चे विनोद महाडिक यांनी मिश्र यांचे स्वागत केले.

मिथ्या अभिमान नको, प्रयत्न हवेत

आपल्याला आपल्या भाषेचे ऐश्वर्य नीट माहिती नाही. आपल्याला बखरीची भाषा समजत नाही, महानुभावाची भाषा कळत नाही, आपल्याला पंथ संत कळत नाहीत, तरीही आपण भाषेचा अभिमान बाळगतो. अभिमान बाळगला की सामाजिक तापमान वाढते. मग पुढचे पाऊल म्हणजे अस्मिता. हा मुद्दा आला की सगळे एकमेकांवर धावून जातात. अभिमान असणे एकवेळ मान्य केले तरी आपण नुसताच अभिमान बाळगतो. भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यात आपण सगळ्या खिडक्या बंद केल्या आहेत. मग भाषेचे, संस्कृतीचे काय होणार? भाषा तुम्हाला बक्षीस देत नाही किंवा भाषा तुम्हाला शिक्षा करत नाही. कोणत्याही भाषेला वकीलपत्राची गरज नसते. आपली जबाबदारी आहे, आपली भाषा पुढे घेऊन जाणे.