Mumbai BJP New President Ameet Satam : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलार यांचा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपाने अमित साटम यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

आज (25 ऑगस्ट) मुंबई भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम यांना त्यांच्यावरील नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार अमित साटम कोण आहेत?

आमदार अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तसेच अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ पासून अमित साटम अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत. अमित साटम हे तीन वेळा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तसेच याआधी अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे.

आमदार अमित साटम यांचा भाजपात प्रदीर्घ असा कार्यकाळ राहिला आहे. तसेच विधानसभेत एक अभ्यासू व आक्रमक असे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ४९ वर्षीय अमित साटम हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रियपणे सहभागी आहेत. अमित साटम यांनी भाजपा मुंबईचे सरचिटणीस म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. आमदार अमित साटम हे स्थानिक पातळीवर काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.