मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून त्यांच्यावर बनावट कागदपत्रे, अनेक ओळखपत्रे, बनावट तपशीलांसह पासपोर्ट मिळवणे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची तक्रार केली आहे. तसेच मोहसीन हैदर यांची सहा नावे असून या नावांची कागदपत्रेही असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. हैदर हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगून, साटम यांनी याप्रकरणी सखोल पोलिस चौकशीची मागणी केली आहे. मोहसीन हैदर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्ली एसआरए प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी कॉंग्रेसचे अंधेरीतील माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साटम यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. या त्रात आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे की, हैदर यांची हैदर मोहिदीन कुट्टी, कुन्ही मोहिदीन कुट्टी, मोहसिन हैदर अमानुल्लाह खान, एसएम हैदर खान, मोहसिन हैदर हाजी हैदर आणि सुपियादथ मोहिदीन मोहसिन हैदर अशी अनेक नावे आणि त्याची कागदपत्रे आहेत. हैदर यांच्या शाळेतील नोंदी, निवडणूक प्रतिज्ञापत्रे, पासपोर्ट कागदपत्रे आणि मतदार ओळखपत्र यादीमध्ये दिसून आले आहेत. हैदरने पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी या पासपोर्टचा वापर केला.

आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे की, १९९४ मध्ये, हैदरने मोहसिद हैदर अमानुल्लाह खान या खोट्या ओळखपत्राने पासपोर्ट मिळवला होता परंतु अमानुल्लाह खान हे त्यांचे सासरे आहेत आणि मुंबई हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे दाखवले होते. त्यावेळी त्यांच्याकडे जन्म दाखलाही नव्हता. तक्रारीनंतर २०१३ मध्ये जप्त केलेला पासपोर्ट २०१४ मध्ये मोहसिद हैदर हाजी हैदर या दुसऱ्या नावाने पुन्हा जारी करण्यात आला. हैदर यांनी अनेक बेनामी मालमत्ता खरेदी केल्या आणि उत्पन्नाच्या स्रोतांशिवाय प्रचंड प्रमाणात मालमत्ता जमवली. मोहसीन हैदर यांचे कुलाबा येथील रुस्तम मनिला येथील हॉटेल व्होल्गामध्ये भागीदारी आहे आणि केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील चारवत्तूर आणि पडना या गावी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन मालकी, रिसॉर्ट्स आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अनेक बेनामी मालमत्ता आहेत आणि त्यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त आहे, असाही आरोप आमदार अमीत साटम यांनी केला आहे.

मोहसीन हैदर यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, या प्रकरणी मोहसीन हैदर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमित साटम हे दरवेळी निवडणूक आली की या प्रकारचे आरोप माझ्यावर करतात. दहा वर्षांपूर्वीही हे आरोप त्यांनी केले होते. मात्र लाचलुचपत विभागाने आणि गुन्हे विभागाने या प्रकरणी मला चौकशीअंती क्लीन चीट दिली असल्याची प्रतिक्रिया हैदर यांनी दिली आहे. पुन्हा तेच तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करून दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप हैदर यांनी केला आहे.

भाजपचे दबावतंत्र ….काँग्रेसचा आरोप

जेव्हा जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न विचारले जातात, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सरकारला प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे न देता सरकारकडून, सरकारमध्ये असलेल्या पक्षाकडून वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा आणि घाबरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारचे आरोप करून मूळ विषयापासून मुंबईकरांचे लक्ष भरकटवण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. आम्ही भाजपाच्या अशा धमक्यांना भीत नाही..घोटाळे उघड करणारच.. जुहू भूखंड घोटाळ्यावर राज्य सरकार व पालिकेला प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्यावीत. – सुरेशचंद्र राजहंस, मुख्य प्रवक्ते, मुंबई काँग्रेस.