मुंबई : मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न हाणून पाडून महापालिकेवर भगवा झेंडा फडकावला जाईल आणि महायुतीचा महापौर निवडून आणला जाईल, असे प्रतिपादन नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोमवारी येथे केले.
आपल्या प्राधान्यक्रमांविषयी बोलताना, आमदार साटम म्हणाले की, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि गृहनिर्माण संदर्भातील विविध प्रश्न सोडविले जातील. शहराची ओळख बदलण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असून ते हाणून पाडले जातील. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून मुंबईत पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू झाले व ते पूर्णत्वास जात आहेत. यामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख या प्रकल्पांचा समावेश आहे. शहरातील २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे देण्यासाठी गृहनिर्माण सुधारणांचाही समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे अणि ते पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असे साटम यांनी सांगितले.
महापालिकेत १९९७ ते २०२२ पर्यंतच्या काळात देशातील सर्वाधिक ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप साटम यांनी केला. महापालिकेला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे साटम यांनी स्पष्ट केले.