मुंबई : महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे, असे परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी व्यक्त केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांना नेस्तनाबूत करा की दुर्बिणीतून ते दृष्टीस पडता कामा नयेत, असा मंत्र शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही, हे शहांचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होते का, यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कारण २०२९ राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे विधान गेल्या वर्षी अमित शहा यांनी केले होते. शहा यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताच सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजपच्या चर्चगेट येथील नियोजित नवीन कार्यालयाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.
राज्यात सध्या डबल इंजिन सरकार सत्तेवर असून त्यामुळे मी समाधानी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवून ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आले पाहिजे, असे शहा यांनी स्पष्ट केले. भाजपने नेहमीच नीतीच्या आधारे राजकारणात कार्य करुन देशातील नागरिकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला. महाराष्ट्रात भाजप आता कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता स्वबळावर उभा आहे. राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होता.
आता पहिल्या क्रमांकाचा मजबूत पक्ष बनला आहे, असे सांगून शहा म्हणाले, जनसंघानंतर भाजपची स्थापना झाली आणि तेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘ अंधेरा छटेगा, कमल खिलेगा..’ असे उद्गार काढले होते. पक्षाच्या वाटचालीत वाजपेयी हे पुढे पंतप्रधान झाले आणि गेली ११ वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ही पक्षासाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रातही फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रालोआ तिसऱ्यांदा सत्तेवर आली आहे.
भाजप घराणेशाहीवर चालत नाही
भाजप घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही, येथे एक चहावालाही पंतप्रधान होतो. पक्षासाठी समर्पण, तळमळ व नेतृत्व गुण यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदापर्यंत पोचू शकले आहेत. मीही पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता व निवडणूक केंद्र किंवा बूथ प्रमुख होतो. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करुन राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मी पोचू शकलो. केवळ नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या जोरावर पक्षात महत्वाच्या पदांवर पोचता येते आणि भाजप असा एकमेव पक्ष आहे, असे शहा यांनी नमूद केले.
भाजपचे संघटनात्मक ६६० जिल्हे असून त्यापैकी ३८७ जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालयांची उभारणी झाली असून ९० जिल्ह्यांमध्ये कामे सुरु आहेत. महाराष्ट्रातही अनेक जिल्हा कार्यालयांची बांधकामे सुरु असून डिसेंबर २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करावीत, अशी सूचना शहा यांनी फडणवीस व चव्हाण यांना केली.
भाजपचे नवीन कार्यालय कसे असेल
चर्चगेट येथील वासानी चेंबरच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या भाजपच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम क्षेत्रफळ सध्या सुमारे ५५ हजार चौ.फूट इतके असेल. सध्या दहा मजली इमारत उभारली जाणार असून उपलब्ध असलेला संपूर्ण चटईक्षेत्र निर्देशांक तूर्तास वापरण्यात येणार नाही. ही इमारत अतिशय देखणी आणि केंद्रीय कार्यालयाच्या धर्तीवर उभारण्यात येणार असून विख्यात वास्तुविशारद हाफीज काँट्रॅक्टर यांनी त्याचे डिझाईन केले आहे.
बहुमजली पार्किंग सुविधेसह अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध असतील. प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्यांनाही स्वतंत्र दालन ठेवण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची दालने असतील. सुमारे ४०० जणांची बसण्याची सोय असलेले सभागृह, ग्रंथालय, बैठका व परिषदांचे कक्ष यासह अनेक सुविधा उपलब्ध असतील. हे कार्यालय दोन ते अडीच वर्षात उभारले जाणार आहे.
