राज्यातील एक हजार गावांचा कायापालट होणार

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत.

अमिताभ, अमिर, सचिनच्या उपस्थितीत आज शुभारंभ

गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी मेटाकुटीस आलेल्या राज्यातील सुमारे एक हजार खेडय़ांचे लवकरच रूप पालटणार असून ही सर्व गावे लवकरच सुजलाम-सुफलाम होणार आहेत. उद्योजकांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या निधीतून या गावांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असून त्याची मुहूर्तमेढ गुरुवारी सकाळी मंत्रालयात महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अमिर खान आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोवली जाणार आहे.

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. या गावांमध्ये आजही पाणी, वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांची वानवा आहे.

मात्र आता अशाच गावांना सर्वार्थाने आदर्शगाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीतून पहिल्या टप्यात राज्यातील एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने एक योजना तयार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी ११ वाजता मंत्रालयात उद्योग क्षेत्रातील नामवंत तसेच तज्ज्ञांच्या समोर या योजनेचा आराखडा मांडणार आहेत. या बैठकीस अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिर खान यांच्यासह उद्योग आणि बँकीग श्रेत्रातील नामवंत सुनिल माथूर(सिमेन्स),संजीव मेहता(हिंदुस्थान युनिलिव्हर), दिपक पारेख( एचडीएफसी बँक), चंद्रा कोचर( आयसीआयसीआय बँक), ए.एम. नाईक( एल अ‍ॅन्ड टी), कुमार मंगलम बिर्ला(अदित्य बिर्ला ग्रुप), रतन टाटा( टाटा समुह), राजकुमार धूत( व्हीडिओकॉन), सज्जान जिंदाल(जिंदाल), मुकेश अंबानी(रिलायन्स) अरूंधती भट्टाचार्य(एसबीआय), सायरस मिस्त्री( टाटा सन्स) यांच्याबरोबरच हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

दुष्काळी एक हजार गावांची निवड करून तेथे या सीएसआर फंम्डातून सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच जलयुक्त शिवार, हागणदारी मुक्त गाव, शिक्षणात सुधारणा, नद्या, नाले, विहिरींचे पुनरूज्जीवन, २४ तास शुद्ध पाणी आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यातून या गावांचा खऱ्या अर्थाने सर्वागिन विकास व कायापालट घडवून आणण्यााच सरकारचा मानस असून त्यासाठी  हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amitabh bachchan sachin tendulkar aamir khan