आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवारांच्या गटात दिसणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका बदलत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच झालेल्या प्रकाराने अस्वस्थ होत खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं. मंगळवारी (४ जुलै) अमोल कोल्हेंनी मुंबईत सिल्व्हर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली.

अमोल कोल्हे म्हणाले, “मी माझी भावना, अस्वस्थता शरद पवारांसमोर मांडली. आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, घडामोडी बघितल्या, तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायित्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.”

“मी शरद पवारांना एक पत्र दिलं”

“मी शरद पवारांना एक पत्र दिलं आहे. त्यात हीच भूमिका मांडली की, मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करत आलो आहे. त्यामुळे ३५० वर्षे अस्तित्वात असलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेऊन मी राजकारणात आलो,” असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

हेही वाचा : शरद पवारांबाबत ‘तो’ प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर, म्हणाले, “त्यांचं वय ८४ वर्षे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणांमध्ये असल्याचं सांगितलं”

“आताच्या परिस्थितीत विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय ही अस्वस्थता मी मांडली. तसेच शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं. हे मी लिखित स्वरुपात त्यांना दिलं. यावर शरद पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणाईची आहे, असं सांगितलं. तसेच त्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं असल्याची आठवण करून दिली,” असंही अमोल कोल्हेंनी नमूद केलं.