अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली.  सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली असून या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.  या दुर्घटनेमुळे विरारवरुन चर्चगेट आणि चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. भर पावसात पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत ओव्हरहेड वायरचेही नुकसान झाले असून वाहतूक कधी पूर्ववत होईल,  हे अद्याप समजू शकलेले नाही. पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.

दुसरीकडे या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली. त्यामुळे मंगळवारी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार ते गोरेगाव आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक सुरु आहे. तर हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते वांद्रेपर्यंतची वाहतूक सुरु आहे.

पश्चिम रेल्वेची हेल्पलाईन

दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून यातील चार जण किरकोळ जखमी आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बोरिवलीतून दक्षिण मुंबईसाठी १८ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर बोरिवली आणि वांद्रे या स्थानकांच्या दरम्यान २७ विशेष बस चालवल्या जाणार आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andheri footover bridge slab collapsed on track western railway disrupted
First published on: 03-07-2018 at 08:06 IST