मुंबई : अंधेरीमधील लिंक रोडवरील ‘क्रिस्टल प्लाझा’ इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर अंबोली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत हुक्का पार्लरमधील चौघांविरोधात कारवाई करण्यात आली असून हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे.

अंधेरी पश्चिमेच्या लिंक रोड येथील ‘क्रिस्टल प्लाझा’मधील ‘इन्फिनिटी लाऊंज’मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अंबोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये बंदी असलेल्या हुक्क्याची विक्री आणि सेवन करण्यात येत असल्याचे आढळले. पार्लरमध्ये हुक्का बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले फ्लेवर, काचाची भांडी, रबरी नळ्या आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. या हुक्का पार्लरचे अग्निसुरक्षा लेखा परिक्षण करण्यात आलेले नव्हते.

हुक्का पार्लरच्या एका टेबलाजवळ झाऱ्यामध्ये पेटते निखारे ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यातून ठिणग्या पडत होत्या. सर्वत्र धूर पसरलेला होता. हुक्का पार्लरमध्ये ज्वलनशील साहित्य होते. त्यामुळे आगीचा मोठा धोका होता. ही आस्थापना कृष्णकांत झाच्या (४२) नावावर होती.

पोलिसांनी पार्लरचा व्यवस्थापक राजा पटेलसह चार कर्मचारी आणि ग्राहकांवर कारवाई केली. आरोपींना कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली. या सर्व आरोपींविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन अधिनियम २०२३ च्या कलम २०, २१, २१ (अ) ४, ४ (अ), ७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८७, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदेशीर हुक्का पार्लरवरील ही आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. यापूर्वी अंधेरी पश्चिम परिसरातील जेव्हीपीडी जुहू येथे ‘टिल नेक्स्ट टाईम’ नावाच्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली होती. या हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना हर्बलच्या नावाखाली तंबाखुजन्य हुक्का दिला जात होता.