मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेली वृक्षछाटणी शास्त्रीय पद्धतीने होत नसल्याचा आरोप सातत्याने नागरिकांकडून होत आहे. सांताक्रुझ येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील झाडांची नुकतीच पालिकेतर्फे वृक्षछाटणी करण्यात आली. मात्र, ही वृक्षछाटणी अयोग्य पद्धतीने होत असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे. याविरोधात फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे वर्षभर वृक्षछाटणी केली जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी हे काम व्यापक स्वरुपात करण्यात येते. दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे आदी घटना घडतात. अनेक वेळा यात जीवितहानीही होते. झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी केल्यास या घटनांना आळा बसू शकतो. मात्र, वृक्ष छाटणी करणाऱ्या कामगारांना याबाबत माहिती नसल्याने अनेकदा अशास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी केली जाते.
यंदाही अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने वृक्षछाटणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नुकतेच सांताक्रुझ येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या झाडांची अनावश्यक छाटणी केल्याचा आरोप वॉचडॉग फाऊंडेशनने केला आहे. केवळ जाहिरात फलकाला अडसर ठरत असल्यामुळे झाड कापण्यात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी केला आहे. अयोग्य वृक्षछाटणीविरोधात शुक्रवारी पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढून वृक्षछाटणीचा निषेध करण्यात आला. झाडे कापणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच, सुदृढ आणि भल्यामोठ्या झाडांची अनावश्यक कत्तल त्वरित थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
के पूर्व विभागात मेट्रो कारशेड, रस्ते रुंदीकरण आदी कारणांमुळे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच, पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उन्मळून पडणाऱ्या झाडांमुळे शहरातील हिरवळ कमी होत आहे. त्यामुळे पालिकेने शास्त्रीय पद्धतीने वृक्षछाटणी करायला हवी. वृक्षछाटणीच्या वेळी तेथे तज्ज्ञ उपस्थित असणे अनिवार्य करायला हवे, अशी मागणी गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.