मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील वित्तीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या सह-संस्थापक राणा कपूर यांच्या एकतर्फी निर्णयामुळे येस बँकेला सुमारे २,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले, असा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. येस बँक आणि अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील कंपन्यांमधील कथित फसव्या व्यवहारांशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नुकतेच आरोपपत्र दाखल केले. त्यात सीबीआयने उपरोक्त दावा केला.

सीबीआयने या प्रकरणी अनिल अंबानी, राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह १३ जण तसेच संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यात कर्ज आणि गुंतवणुकीशी संबंधित गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप या सगळ्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांचा मुलगा आणि रिलायन्स कॅपिटलचे तत्कालीन कार्यकारी संचालक अनमोल अंबानी यांच्या भूमिकेबाबत पुढील तपास सुरू आहे, असेही सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. येस बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राणा कपूर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानी यांच्या एडीए समूहाच्या वित्तीय कंपन्यांमध्ये ५,०१० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीत रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या (आरएचएफएल) नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) २,९६५ कोटी रुपये आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडच्या (आरसीएफएल) कमर्शियल पेपर्समध्ये २,०४५ कोटी रुपये समाविष्ट होते.

एकूण रकमेपैकी ३,३३७.५ कोटी रुपये डिसेंबर २०१९ पर्यंत नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये (एनपीआय) रूपांतरित झाले, असा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. या गुंतवणूकींवरील हमीमधून बँक संपूर्ण उत्पन्न वसूल करू शकली नाही आणि त्यामुळे २,७९६.७७ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एडीएच्या काही संस्था बनावट कंपन्या असल्याचा दावा देखील सीबीआयने आरोपपत्रात केला आहे.