राज्यात मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी संप सुरू आहे. यावर राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय देखील जाहीर केला. मात्र, त्यानंतरही काही कर्मचारी संघटना विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहेत. दरम्यान, कामगारांमध्ये अनेक अफवाही पसरत आहेत. त्यावर थेट राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय. सध्या अफवांचे पिक आले आहे असं म्हणत अनिल परब यांनी ६० दिवस संप सुरू राहिल्यावर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का यावरही उत्तर दिलं.

अनिल परब म्हणाले, “सध्या वेगवेगळ्या अफवांचं पीक आलंय. संप ६० दिवस चालू राहिला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, अशा अफवा आहेत. मात्र, अशा प्रकारचा कोणताही कायदा नाही असं मला एसटी कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं. ६० दिवस संप झाला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो म्हणून विलिनीकरणाची मागणी मान्य होईल, असं सांगितलं जातं. मात्र, विलिनीकरणाचा निर्णय न्यायालयाच्या समितीच्या माध्यमातूनच होईल. त्यामुळे अशा अफवांना कामगारांनी बळी ठरू नये.”

“एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ परत घेण्याचा प्रश्नच नाही”

“एसटी महामंडळ विलिनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून निर्णय होईल. तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने कामगारांबाबत सहानुभुतीपूर्वक धोरण घेऊन अतिशय चांगली पागरवाढ दिली. मात्र, काही लोक ही पगारवाढ फसवी, ही पगारवाढ काही दिवसांसाठी आहे. ही पगारवाढ परत घेतली जाईल. अशा प्रकारच्या बातम्या काही लोक पसरवत आहेत. मी स्पष्ट सांगतो आम्ही पगारवाढीचे स्पष्ट आदेश काढले आहेत. त्यामुळे दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

हेही वाचा : Video: “…अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू”, अनिल परब यांचा इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पगारवाढीचे आकडे स्लिपमध्ये दिसतील”

अनिल परब म्हणाले, “मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी आपल्या समोर ठेवला होता. त्या तक्त्यामध्ये जे आकडे आहेत ते कामगारांच्या पगाराच्या स्लिपमध्ये येणार आहेत. त्यामुळे ज्या दिवशी पगाराची स्लीप येईल तेव्हा आम्ही खोटं बोलतोय की खोटं हे स्पष्ट होईल. मी माध्यमांसमोर ही आकडेवारी जाहीर केलीय. त्यामुळे ती पगारवाढ मागं घेण्याचा प्रश्नच येत नाही.”