Anil parab reaction on mumbai highcourt decision on dasara melava spb 94 | Loksatta

“शिवसेना आणि शिवाजी पार्क हे नातं….”; दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Anil-Parab
संग्रहित

शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना न्यायालयाची परवानगी: शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “असा निर्णय न्यायालयाने…”

काय म्हणाले अनिल परब?

१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होते आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्कचे जे नातं आहे, ते पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने अधोरेखीत केलं आहे. आमचा अर्ज मुंबई मनपाकडे आम्ही पाठवला होता. मात्र, अनेक दिवसांपासून त्यावर निर्णय होत नव्हता. ज्यावेळी आम्ही विचारणा केली, तेव्हा आमचा अर्ज कायदा सुवस्थेच्या कारणास्तव नाकारण्यात आला, असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. या सर्व घडामोडी मोठ्या वेगाने झाल्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

न्यायालयाने महानगरपालिकेच्या बाबतीत काही टीपणी केली आहे. तसेच पोलिसांनाही सुचनाही दिल्या आहे. आम्हीही सर्व अटींचे पालन करून असे आम्ही न्यायालयाला सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“हा केवळ दसरा मेळावा नसून या दिवशी शस्रपूजनही केल्या जाते. या सर्व गोष्टी आम्ही आज उच्च न्यायालयासमोर ठेवल्या होत्या. त्याचबरोबर सदा सरवणकर यांनी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, तिथे दोन शिवसेना आहेत आणि आमच्या शिवसेनेकडे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे आम्हालाही परवानगी मिळावी, परंतु न्यायालयाने त्याबाबतीत स्पष्ट नकार दिला. न्यायालयाने सांगितलं की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही यावर काहीही निर्णय देणार नाही. दरम्यान, मुंबई महापालिकेला यासंदर्भात सुचना देण्यात आल्यात आहेत. तसेच पोलिसांनाही सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? हा प्रश्न लोकांना पडला होता. या सर्व चर्चांना न्यायालयाने पूर्ण विराम दिला आहे” , असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2022 at 17:31 IST
Next Story
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना न्यायालयाची परवानगी: शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “असा निर्णय न्यायालयाने…”