मुंबई : करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित ‘लोकसत्ता’च्या ७४ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रंगला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘लोकसत्ता’चे अमृतमहोत्सवी वर्षांतील पदार्पण हा योग साधून निवडक राष्ट्रीय नेत्यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधीही उपस्थितांना मिळाली. करोना संसर्गाचे भय काहीसे कमी झाले असले तरी शासकीय नियम पाळून ‘लोकसत्ता’चा ७४ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी सायंकाळी एक्स्प्रेस टॉवरच्या हिरवळीवर रंगला. या सोहळय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

भारताच्या अमृत महोत्सवाचा योग साधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यव्यवस्थेच्या अनुषंगाने मांडलेल्या विचारांचे अभिवाचन यावेळी करण्यात आले. दिग्दर्शक, निर्माते चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते अविनाश नारकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि दिग्दर्शिका-लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांनी हे अभिवाचन केले.

राष्ट्रीय नेत्यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार

‘अभिनव भारत’च्या सांगता समारंभात, ११ मे १९५२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या भाषणाचे अभिवाचन मृणाल कुलकर्णी यांनी केले. सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल समाजमनातील प्रतिमा कशा चुकीच्या आहेत त्याबद्दल सावरकरांनी सविस्तर विवेचन या भाषणात केले आहे. सशस्त्र क्रांतिकारकांचा ‘भयंकरवाद’ (टेररिझम) हे अमोघ अस्त्र होते. अशाप्रकारे ब्रिटिशांवरील छुपे हल्ले, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हत्या यांमुळे त्यांचे भारतातील साम्राज्य उलथून टाकणे शक्य होणार नाही हे क्रांतिकारकांना ज्ञात होते. मात्र या भयंकरवादाच्या अस्त्राने ब्रिटिशांच्या मनात भय निर्माण करणे हा क्रांतिकारकांचा उद्देश होता, यासह सैनिकीकरण आणि परराष्ट्र राजकारणाचा समावेश क्रांतिकारकांनी कार्यपद्धतीत कसा केला याबद्दल त्यांनी मांडलेले विचार मृणाल कुलकर्णी यांनी वाचून दाखवले.

सावरकर, गांधी, आंबेडकर आणि नेहरू या चारही नेत्यांबद्दल कायम उलटसुलट चर्चा होत राहिली असली तरी या चौघांचा लोकशाही देशाबद्दलचा मुलभूत विचार एकच होता, असे सांगून चंद्रकांत कुलकर्णी यांनी गांधीजींच्या ‘लोकशाहीचे अधिष्ठान’ या लेखाचे अभिवाचन केले. भाषण, वृत्तपत्र आणि सभास्वातंत्र्य अबाधित ठेवणे म्हणजे खरे स्वातंत्र्य म्हणता येईल, असे गांधीजींनी नमूद केले आहे. सुराज्यात नेमून दिलेल्या नियमाप्रमाणे वर्तन न झाल्यास शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यासाठी त्यांचे हक्कच काढून घेणे ही शिक्षा असू शकत नाही, असेही त्यांनी या लेखात स्पष्ट केले आहे. नि:शस्त्र प्रतिकार म्हणजे अिहसा असे समजण्याची चूक आपण केल्याची कबूली देतानाच प्रत्येकाच्या मनात दडलेली हिंसा कशी उफाळून आली, त्यातून निर्माण झालेला प्रांतवाद, वाढत गेलेला लष्करी हस्तक्षेप यामुळे एकतर अध:पतन किंवा हुकूमशाही व्यवस्था निर्माण होते याबद्दलची भीती त्यांनी भाषणात व्यक्त केली.

हजारो जातींमध्ये विभागला गेलेला आपला समाज एक राष्ट्र कसा होईल?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे अभिवाचन अविनाश नारकर यांनी केले. ५ नोव्हेंबर १९४८ रोजी घटनासमितीवरील चर्चेला उत्तर देताना बाबासाहेबांनी हे भाषण केले होते. समता आणि बंधुत्वाची भावनाच नाकारणे हा राष्ट्रनिर्मितीतील मोठा अडथळा आहे. लोकांचे लोकांनी बनवलेले लोकांसाठीचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे अडथळे दूर केले पाहिजेत, हे सांगतानाच इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्या देशाच्या राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजेचे स्तोम प्रचंड असल्याने त्याच्या परिणामी देशाचे अध:पतन वा हूकमशाही राष्ट्रात परिवर्तन होऊ शकते हेही बाबासाहेबांनी परखडपणे मांडले आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री केलेल्या भाषणाचे अभिवाचन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कुणाल रेगे यांनी लोकमान्य टिळकांच्या ‘सरकारी हमालखाने’ या अग्रलेखाचे अभिवाचन केले. या नेत्यांचे परखड विचार आपल्या अभिवाचनातून लोकांसमोर

ठेवणाऱ्या या कलाकारांचाही यावेळी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संभारंभाला हजेरी लावली होती.

तारांकितांची उपस्थिती..

’ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत, भाजपचे आमदार आशिष शेलार व अतुल भातखळकर.

’ अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक व प्रधान सचिव दीपक कपूर, ‘मेहारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता, उपलोकायुक्त संजय भाटिया, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पर्यटन संचालनयाचे संचालक मिलिंद बोरीकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे  महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे.

’ सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे , सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक परिमंडळ) डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त (सायबर) डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. हरी बालाजी, लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ कोळेकर व निरीक्षक कदम.

उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या  अध्यक्षा मृदृला भाटकर, पालिका रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे, मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, सहाय्यक आयुक्त (जी उत्तर) किरण दिघावकर, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव.

’ पावनिखड चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेले लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, सुश्रुत मंकणी, संगीतकार देवदत्त बाजी, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, दिग्दर्शक, निर्माते अजित भुरे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळय़े, जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे.

’ मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रिवद्र कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, जनसंपर्क अधिकारी डॉ लीलाधर बनसोड, झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, एसएनडीटी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी हर्षदा वेदपाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कूटे.  

’ भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर, माजी क्रिकेटपटू विनायक सामंत, जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक वर्षां उपाध्ये, मल्लखांब प्रशिक्षक नीता ताटके, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू वीणा खवळे-शेलटकर, कबड्डी संघटक शशिकांत राऊत.

‘लोकसत्ता’च्या अमृतमहोत्सवी वर्षांतील पदार्पणानिमित्त आयोजित सोहळय़ावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आबासाहेब जऱ्हाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डॉ. पी. अनबलगन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या उषा काकडे, सिडकोच्या प्रिया रातांबे उपस्थित होत्या.           छाया : अमित चक्रवर्ती