हिंदीतील मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शन तारखा जाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दिवाळीनंतर जोमाने व्यवसायाची सुरूवात करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला देशभरात पसरलेल्या तिसऱ्या करोना लाटेचा पुन्हा फटका बसला. जानेवारी. फेब्रुवारीत जे चित्रपट प्रदर्शित होणार होते, त्यांच्या तारखा पुन्हा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र गेल्या आठवडय़ात दिल्लीतील चित्रपटगृहे सुरू झाल्याने पुन्हा एकदा हिंदीतील मोठे चित्रपट तिकीटबारीवरच्या खेळासाठी सज्ज झाले आहेत. २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटापासून मोठे चित्रपट रांगेने प्रदर्शित होणार आहेत.

गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात देशभरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढली आणि दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशमधील काही शहरांतून चित्रपटगृहे बंद करण्यात आली. हिंदी चित्रपटांचा बराचसा व्यवसाय या पट्टयातून होत असल्याने ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘जर्सी’ या चित्रपटाबरोबरच ‘राधेश्याम’, ‘आरआरआर’ अशा मोठय़ा चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दिल्लीतील चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. मुंबईसह अनेक राज्यातील शहरांमध्ये रात्रीच्या शोवरचे निर्बंधही हटवण्यात आले असल्याने हिंदी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पहिल्यांदा आपला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ दर आठवडय़ाला एक असे सलग चार मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

 चित्रपटगृहांची एकजूट..

दिल्लीत सरकारने योग्य वेळी चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी यांनी आभार मानले आहेत. लोकांच्या आरोग्याबरोबरच अर्थव्यवस्थेचे आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे, त्यादृष्टीने चित्रपटगृहे सुरू ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असल्याने त्यांचे आभार मानण्याचा एकत्रित प्रयत्न पहिल्यांदाच चित्रपटगृह व्यावसायिकांकडून केला जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण ४ फेब्रुवारीला होणार असून आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, मिराज, कार्निव्हल सिनेमा या बहुपडदा चित्रपटगृह समूहांच्या देशभरातील चित्रपटगृहांमधून हा सोहळा दाखवला जाणार आहे.

फेब्रुवारी ते मार्च..मेपर्यंतच्या तारखा जाहीर

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर जोडीचा ‘बधाई दो’ हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या एक दिवस आधी २४ फेब्रुवारीला दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारचा बहुप्रतिक्षित ‘वलिमाई’ हा तमिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांची असून अभिनेत्री हुमा कुरेशीही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नागराज मंजूळे दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ ११ मार्चला, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बच्चन पांडे’ १८ मार्चला, तर रामचरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण अशा कलाकारांची फौज असलेला एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘भुलभुलैय्या २’ हा चित्रपट २५ मार्चला तर ‘अनेक’ हा आयुषमान खुराणाची भूमिका असलेला चित्रपट ३१ मार्चला प्रदर्शित होणार होता, मात्र या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन मेमध्ये होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of big hindi movies akp
First published on: 03-02-2022 at 00:18 IST