मुंबई : हुतात्मा चौक येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुन्हा प्राप्त झाला. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयात शोध मोहीम राबवली, पण त्यात काहीच संशयास्पद सापडले नाही. यापूर्वीही गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी प्राप्त झाली होती. त्यावेळी कोर्टरुम रिकामे करून तपासणी करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाला शुक्रवारी पहाटे धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर तातडीने सकाळीच उच्च न्यायालयात तपासणी करण्यात आली. पण काहीही संशयास्पद सापडले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. उच्च न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी गेल्या आठवड्यात दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्या दोन्ही प्रकरणामागे एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. पण आरोपीने डार्क नेट व व्हीपीएनचा वापर केला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे आता पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.