नवीन पिंजरा उभारल्यानंतरच पर्यटकांना संधी

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) दुसऱ्या टप्प्याचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण पूर्ण होईस्तोवर पर्यटकांना या ठिकाणी असलेल्या काळवीटांचे (ब्लॅकबक) दर्शन दुर्मीळ होणार आहे. सद्य:स्थितीत प्राणिसंग्रहालयात दोन काळवीट असून याआधी येथील त्यांची संख्या ३३ इतकी होती. मात्र २०१६-१७ या कालावधीत ३१ काळवीटांचा मृत्यू झाला. त्यामुळे उरलेल्या दोन काळवीटांचे दर्शन नवीन पिंजऱ्याच्या उभारणीनंतरच घडणार आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत प्रथम श्रेणीमध्ये काळवीट या प्राण्याला संरक्षण देण्यात आले आहे. एका कळपात १० ते ३० काळवीटे असतात.

काळविटांचा मृत्यू वृद्धापकाळाने

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या २०१६-१७ सालच्या वार्षिक अहवालानुसार या ठिकाणी ३३ काळवीट होती. यामध्ये सहा नर आणि २७ माद्यांचा समावेश होता. मात्र त्यापैकी २५ मादी आणि ६ नर काळवीटांच्या मृत्यूची नोंद अहवालामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित दोन माद्यांना सुमारे दीड वर्षांपासून संग्रहालयातील चितळांच्या पिंजऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. वार्षिक अहवालामध्ये नोंद करण्यात आलेल्या ३१ काळवीटांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी दिली. त्यामुळे उरलेल्या दोन काळवीटांची रवानगी वेगळ्या पिंजऱ्यात करण्यात आली असून नवीन पिंजरा उभारल्यानंतर त्यांना पाहता येणार असल्याचे राऊळ म्हणाल्या.