अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना घाटकोपर अंमलीपदार्थ विरोधी पथकाने माहीम परिसरातून अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी २८ लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. माहीमच्या कमला नगर परिसरात दोन व्यक्ती अंमलीपदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती घाटकोपर अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १४० ग्रॅम एमडी हे अंमलीपदार्थ सापडले. त्याची किंमत २८ लाख रुपये असल्याची माहिती घाटकोपर अंमलीपदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.