मुंबई: कौंटुबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने अमृत महोत्सवी टप्पा गाठला आहे. गेल्या सात दशकांचा हा प्रवास यंदा एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाने पूर्ण करण्याचा मानस बाळगणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनचा ‘उंचाई’ हा नवीन चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात राजश्री प्रॉडक्शनशी गेले काही वर्ष जोडले गेलेले अभिनेते अनुपम खेर यांनी ‘उंचाई’च्या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अनुपम खेर यांनी ‘या’ कारणामुळे घेतली अनुराग ठाकुरांची भेट; फोटो शेअर करत म्हणाले…

राजश्री प्रॉडक्शनची अमृत महोत्सवी वाटचाल आणि ‘उंचाई’ हा त्यांचा साठावा चित्रपट असा वेगळा योग जुळून आला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनुपम खेर यांच्याबरोबरीने राजश्री प्रॉडक्शनशी फारसे संबंध न आलेल्या अनेक कलाकारांनी एकत्र काम केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता बोमन इराणी, अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका, डॅनी डेंग्झोपा, नफीसा अली आणि परिणीती चोप्रा यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. राजश्री प्रॉडक्शन आणि अभिनेते अनुपम खेर यांचे नाते खास आहे. अनुपम खेर यांनी ३८ वर्षांपूर्वी राजश्री प्रॉडक्शनसोबत त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बोमन इराणी या चित्रपटाचा भाग कसे झाले? याचा किस्सा अनुपम यांनी यावेळी सांगितला. सूरज बडजात्यांनी बोमन यांना चित्रपटासाठी विचारले असता काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनुपम खेर यांनी बोमन यांना फोन केला आणि मैत्रीच्या नात्याने काही गोष्टी सांगितल्या. या चित्रपटाचा तू भाग झालास तर तू इतिहासाचा भाग होशील हे विसरू नकोस, असे अनुपम यांनी सांगितले. आणि अनुपम यांच्या त्या शब्दांखातर लगेचच बोमन इराणी यांनी सूरज बडजात्यांना फोन करून चित्रपटात भूमिकेसाठी होकार दिला. दिग्दर्शक सूरज बडजात्यांबरोबर अनुपम खेर यांचा हा पाचवा चित्रपट असून ‘उंचाई’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.

हेही वाचा >>> Video : एरव्ही शेतीमध्ये रमणारे प्रवीण तरडे जीममध्ये करताहेत मेहनत, ‘सरसेनापती हंबीरराव’नंतर नव्या चित्रपटाची तयारी

कौंटुबिक चित्रपटांची निर्मिती करणे ही प्रामुख्याने राजश्री प्रॉडक्शनची खासियत असून आतापर्यंत ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन?’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. ‘उंचाई’चे या वर्षाच्या सुरुवातीला मुख्य चित्रिकरण पूर्ण करण्यात आले आहे. नेपाळ, दिल्ली, मुंबई, आग्रा, लखनौ आणि कानपूरमध्ये या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात आले असून ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher boman irani a part of rajshree productions mumbai print news ysh
First published on: 18-10-2022 at 19:35 IST