लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता आमिर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची प्रसारित झालेली चित्रतफीत डीपफेक तंत्रज्ञानच्या वापरातून तयार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफीतीमध्ये आमिर खान राजकीय प्रचार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. डीपफेकद्वारे आमिरचा आवाज बदलण्यात आला आहे. ही चित्रफीत ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातील आहे. त्यात भाजपावर टीका करत आमिर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रफीतीबाबत समजल्यानंतर आमिर खानने स्वतः याप्रकरणी खुलासा करत चित्रफीत खोटी असल्याचे सांगितले.

आणखी वाचा-बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई

यावेळी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नाही, असे म्हटले होते. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम ४१९ (तोतयागिरी), ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.