मुंबई : केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी सोमवारी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) अद्ययावत जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) देणगी स्वरुपात दिली. यामुळे केईएम रुग्णालयात गंभीर स्थितीत जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना याचा लाभ होणार आहे.
केईएम रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये अद्ययावत जीवरक्षक प्रणाली यंत्र २०१७ मध्ये घेण्यात आले होते. मात्र ते आता जुने झाले असल्याने नव्या जीवरक्षक प्रणालीची आवश्यकता होती. यासंदर्भात अनुराधा पौडवाल यांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘सूर्योदय फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अवघ्या चार दिवसांमध्ये जीवरक्षक प्रणाली केईएम रुग्णालयालया उपलब्ध करून दिली.
ही प्रणाली बंगळूरूहून मुंबईमध्ये आणण्यात आली. या जीवरक्षक प्रणालीची किंमत साधारणपणे ३० लाख रुपये इतकी आहे. नव्याने रुग्णालयात दाखल झालेली जीवरक्षक प्रणाली ही मुदतीपूर्व जन्माला येणाऱ्या बाळांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या प्रणालीमुळे बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्यावतीने दानस्वरूपात देण्यात आलेला व्हेंटिलेटर अतिशय विनम्रपणे स्वीकारण्याचा मान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या नात्याने मला मिळाला आहे. पौडवाल यांनी दिलेल्या जीवरक्षक प्रणालीद्वारे उपचार घेणारे एखादे बाळ भविष्यात एक विख्यात गायक होऊ शकतो, असा सकारात्मक आशावादही मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच डॉ. पौडवाल यांचे भारतीय संगीत आणि भक्तीमय संगीतासाठीचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. भारतातील अनेक पिढ्यांसमोर डॉ. पौडवाल यांचा आदर्श आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील समर्पण आणि योगदान हे एका उत्तम शिकवणीसारखेच आहे. समाजासाठी परोपकाराच्या भावनेतून डॉ. पौडवाल यांनी आरोग्य, जल, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या सूर्योदया फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भरीव योगदान दिल्याने भूषण गगराणी यांनी यावेळी सांगितले.
संगीत हे एखाद्या उपचारामध्ये अतिशय परिणामकारक आहे. कोणत्याही प्रकारचे संगीताचे शिक्षण घेतलेले नसतानाही कठोर परिश्रम करत संगीत क्षेत्रासाठी योगदान देता आले, यासाठीचे समाधान डॉ. पौडवाल यांनी यावेळी व्यक्त केले. संगीतामध्ये उपचाराचा गुणधर्म आहे. त्यामुळे संगीताचा आधार घेऊन रूग्ण बरे व्हावेत, असेही मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
जीवरक्षक प्रणालीचे सोमवारी अनावरण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व त्यांचे कुटुंबीय, नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य कृष्णा महाडिक, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते.
