मुंबई : दसरा अवघ्या काही दिवसांवर आला असून यंदा दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यावेळी अद्याप शिवसेनेच्या ठाकरे गटानेच पालिका प्रशसानाकडे अर्ज सादर केला आहे. ठाकरे गटाने तीन महिन्यांपूर्वीच सादर केलेल्या या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. दसरा मेळावा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा असून आता जेमतेम २० दिवस शिल्लक आहेत. शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन गटात प्रतिष्ठेची लढाई झाली होती. मात्र दोन्ही वेळेला उद्धव ठाकरे यांच्या गटालाच परवानगी मिळाली होती. यंदाही ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी परवानगीसाठी अर्ज दिला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी अर्ज दिला असून अद्याप त्यावर पालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सावंत यांनी दिली. या प्रकरणी पालिकेला तीन वेळा स्मरणपत्रही पाठवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अद्यापपर्यंत केवळ ठाकरे गटाचाच अर्ज आला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. मात्र तरीही निर्णय न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा – मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण

हेही वाचा – मुंबई : पुलाची तुळई उभारण्यासाठी ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेची शकले पडल्यानंतर २०२२ च्या दसरा मेळाव्यापूर्वी मैदानाच्या परवानगीवरून दोन गटांत आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. दोन गटांतील वाद न्यायालयात पोहोचला होता. ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. त्या मेळाव्याला राज्यातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता व ठाकरे यांना सहानुभूतीही मिळाली होती. गेल्यावर्षी २०२३ च्या दसरा मेळाव्यालाही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज दिले होते. तेव्हाही ठाकरे गटाने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र दिले होते, तसेच विभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. वाद शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेने अद्याप अर्ज दिला नसल्याचे समजते.