मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या १४९ दुकानांच्या ई लिलावाची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या अर्ज प्रक्रियेला सोमवारी मुंबई मंडळाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार आता १० सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरु राहणार असून ११ सप्टेंबरला ई लिलावाचा निकाल जाहिर केला जाणार आहे.

म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीकरिता काही दुकानेही बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलावाद्वारे केली जाते. त्यानुसार गेल्यावर्षी मुंबई मंडळाने १७३ दुकानांचा ई लिलाव केला होता. मात्र या ई लिलावात केवळ ४९ दुकाने विकली गेली आणि १२४ दुकाने रिक्त राहिली. या रिक्त दुकानांसह नवीन दुकानांचा समावेश करत ऑगस्टमध्ये मुंबई मंडळाने १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. तर १२ ऑगस्टपासून दुकानांच्या नोंदणी, अर्जस्वीकृतीस सुरुवात केली. त्यानुसार सोमवारी, २५ ऑगस्टला संगणकीय पद्धतीने बोली लावण्याची अंतिम तारीख होती. तर ई लिलावाचा निकाल २९ ऑगस्टला जाहिर होणार होता. मात्र ही मुदत संपण्याआधी, सोमवारी मुंबई मंडळाने अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून १० सप्टेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई लिलावासाठी बोली लावता येणार आहे. तर ई लिलावाचा निकाल ११ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जाहिर केला जाणार आहे.

मुदतवाढ देण्यामागचे कारण मंडळाला विचारले असता मंडळातील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक नागरिकांना ई लिलावात सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी सोमवारी सकाळपर्यंत अंदाजे ४६२ इच्छुकांनी नोंदणी केली होती. हा प्रतिसाद कमी असल्याने मुदतवाढ दिल्याचे समजते आहे.

कुठे किती दुकाने

मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६ , बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ आणि शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी ०१ दुकाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.