मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांसाठी (१४ भूखंडांसह) अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याची मुदत बुधवारी रात्री ११.५९ वाजता संपली. अखेरच्या दिवशी ५९ हजार ५८ इच्छुकांनी अर्ज भरले. यापैकी ४० हजार ४५४ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले असून आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज जमा करण्याची मुदत शुक्रवारी रात्री ११.५९ मिनिटांनी संपणार आहे. या सोडतीसाठी किती जणांनी अर्ज जमा केले हे शनिवारी स्पष्ट होईल. तर सोडतीत नेमके किती जण सहभागी होणार हे ४ मे रोजी, स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होईल.
म्हाडाच्या नव्या सोडत प्रक्रियेनुसार ८ मार्चपासून सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली. ४६५४ पैकी प्रथम प्राधान्य योजनेतील २०४८ घरे वगळता उर्वरित घरांच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला ८ मार्च रोजी सुरुवात झाली. तर २०४८ घरांसाठीची अर्ज विक्री-स्वीकृती १७ मार्चपासून सुरू झाली. बुधवारी रात्री ११.५९ अर्ज अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली. या मुदतीत ५९ हजार ५८ जणांनी अर्ज भरले. तर यापैकी ४० हजार ४५४ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज (गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत) जमा केले आहेत. आता आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज जमा करण्याची मुदत शुक्रवारी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे.
हेही वाचा >>>“…अन्यथा सभेत घुसणार”, गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रतिआव्हान; म्हणाले, “घुसा आणि…”
अर्ज विक्रीची पाहता सोडतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या ५५ ते ५९ हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी मागील काही वर्षांतील हा सर्वात कमी प्रतिसाद असणार आहे. याआधीच्या सोडतीसाठी दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले होते. यंदा सोडतीअधीच अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्यात आल्याने अर्ज कमी दाखल झाले आहेत. मात्र यावेळी ४० हजार अर्जदार वा अंतिम मुदतीत अर्ज सादर करणारे अर्जदार पात्र अर्जदार असणार आहेत. त्यामुळे सोडतीत विजेत्याचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याआधीच्या सोडतीत लाखोंच्या संख्येने अर्ज आल्यानंतर त्यातील मोठया संख्येने अर्ज अपात्र ठरत होते. विजेते ठरल्यानंतर कागदपत्र सादर करताना ते अपात्र ठरत होते. त्यावेळी अर्जासोबत कागदपत्र जमा करण्याची अट नसल्याने अनेक जण अर्ज करू शकत होते.