मुंबई : चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने घेतल्याने मार्चमध्ये रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला दिली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २ जूनपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेला चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून बंद करून त्याऐवजी ४ वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (आयटीईपी) राबविण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने घेतला आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) सुरू करण्यात आलेली केंद्रीभूत नोंदणी प्रक्रिया ९ मार्च रोजी बंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम २०२५-२६ ऐवजी २०२६-२७ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी कक्षाला दिले आहेत. त्यानुसार आजपासून या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सीईटी कक्षाकडून सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच २० जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.