मुंबई : बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्षा) बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ७ व ८ एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा घेतली होती. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी सुमारे १२ हजारांहून अधिक जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी राज्यभरातून ४७ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४३ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल १५ मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र दीड महिना उलटला तरी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अखेर ८ जुलैपासून प्रवेश फेरीसाठी अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्क भरून अर्ज निश्चिती करता येणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना रंगीत स्कॅन कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले.
बी.एस्सी नर्सिग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती पुस्तिका नीट वाचून पात्रता तपासावी. विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरल्यास त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती भरू नये. तसेच विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणीच्या शेवटच्या तारखेपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे.