मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती केली. ‘माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता ही कंपनी कामाठीपुरा पुनर्विकासासाठी बृहत आराखडा तयार करील.

दक्षिण मुंबईत ७७,९४५.२९ चौरस मीटर जागेवर वसलेल्या कामाठीपुऱ्यातील इमारतींची दुरवस्था झाली असून येथील इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरूस्ती मंडळावर सोपवली आहे.

हेही वाचा – वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

ही जबाबदारी आपल्याकडे आल्यानंतर मंडळाने कामाठीपुरा परिसराचे सर्वेक्षण करून प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला. या व्यवहार्यता अभ्यासाचा अहवाल राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी सादर केला होता. त्यानुसार नोव्हेंबर २०२३ मध्ये उच्चस्तरीय समितीने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. त्यानंतर मंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. ही निविदा अंतिम करून मंडळाने अखेर सल्लागाराची नियुक्ती केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रकल्पाचा लवकरच बृहत आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. दक्षिण मुंबईत ७७,९४५.२९ चौरस मीटर जागेवर वसलेल्या कामाठीपुऱ्यातील इमारतींची दुरवस्था झाली असून येथील इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी गेली काही वर्षे करण्यात येत होती.

हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, १३,४०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण

सदनिका वाटप नियम

– दक्षिण मुंबईत एकूण ७७,९४५.२९ चौरस मीटर जागेवर वसलेल्या कामाठीपुरात ४७५ उपकरप्राप्त इमारती.

– उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती तसेच ‘पीएमजीपी’ इमारती.

– ५२ इमारती कोसळल्या असून येथे १५ धार्मिकस्थळे असून दोन शाळा, चार सरकारी कार्यालये आणि आठ इतर बांधकामे.

– प्रकल्पाअंतर्गत कामाठापुरा येथील ६,०७३ रहिवासी आणि १,३४२ अनिवासी रहिवाशांचे पुनर्वसन.

– निवासी रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर, तर अनिवासी रहिवाशांना कमीत कमी २२५ चौरस फुटांचा अनिवासी गाळे दिले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– जमीन मालकांना द्यावयाचा मोबदलाही ठरविण्यात आला आहे. त्यानुसार ५० चौरस मीटरपर्यंत जागा असलेल्यांना ५०० चौरस फुटांचे एक घर, ५१ ते १०० चौरस मीटर जागा असल्यास ५०० चौरस फुटांची दोन घरे, १०१ ते १५० चौरस मीटर जागा असलेल्यांना ५०० चौरस फुटांची तीन घरे आणि पुढे याप्रमाणे घरे देण्यात येतील.