मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या कामामुळे, आरे कारशेडच्या कामामुळे आरेमध्ये पुर येईल, पाणी साचेल ही आरेतील रहिवाशांची आणि पर्यावरणप्रेमींची भीती अखेर सोमवारच्या मुसळधार पावसाने खरी ठरवली. सोमवारी आरेतील आरे पिकनिक पाॅईंट ते मरोळ रस्त्यावरील मेट्रो ३ मार्गिकेतील भुयारी मार्गावर गुडघ्याहून अधिक पाणी होते. त्यामुळे वाहनचालक-पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दुसरीकडे आरेतील युनिट नंबर २२ मधील नाला भरुन वाहू लागल्याने नाल्यालगतचा रस्ता पाण्याखाली गेला. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीचे सर्व नैसर्गिक मार्ग बंद केल्याने आणि पिकनिक पाॅईंट ते मरोळ रस्त्याचे रुपांतर भुयारी मार्गात केल्याने पाणी साचल्याचा आरोप आरेतील आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
मेट्रो ३ मार्गिकेची कारशेड आरे जंगलातील ३३ हेक्टर जागेवर बांधण्याचे प्रस्तावित केल्याचे जाहिर झाल्याबरोबर आरेतील आदिवासीनी आणि पर्यावरणप्रेमींनी आरे कारशेडला विरोध करत आरे बचाव आंदोलन उभारले. या कामामुळे आरेसह मुंबईत पुरपरिस्थिती निर्माण होईल असा आरोप केला. यासाठी आरे बचाव आंदोलनातील कार्यकर्यांनी न्यायालयीन लढाईही लढली. मात्र आरे बचाव आंदोलनाला लढ्यात यश आले नाही आणि अखेर कारशेड तयार झाली आणि भुयारी मेट्रो धावू लागली. अशात सोमवारी मुंबईत झालेल्या अतिमुसळधार पावसाने आदिवासींची आणि पर्यावरणप्रेमींची आरेत पाणी भरण्याची भीती खरी असल्याचे सिद्ध केले. मेट्रो ३ मार्गिकेतील जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरुन मेट्रो गाड्या पुढे आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी एमएमआरसीकडून आरे पिकनिक पाॅईंट येथून पवई आणि मरोळकडे जाणार्या रस्त्याचे रुपांतर भुयारी मार्गात केले आहे. त्याचवेळी या रस्त्यावरुन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते सोमवारी या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची माहिती आरेतील एका पाड्यातील रहिवासी हर्षाली वळवी यांनी दिली. भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या पाड्यातील सगळी मुले मरोळला शाळेत जातात. तेव्हा आज मुलांना शाळेत घेऊन येताना आम्हाला अनेक अडचणीला जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
आरेतील मेट्रो ३ मार्गिकेतील भुयारी मार्गासह आरेतील युनिट २२ येथील एक मुख्य रस्ताही पाण्याखाली गेला. युनिट २२ येथे एक मोठा नाला आहे. हा नाला मेट्रोच्या कामामुळे अरुंद झाल्याने सोमवारी भरुन वाहू लागला आणि पाणी रस्त्यावर आले. मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने त्यात वाहने अडकली, वाहतूक कोंडी झाली आणि रहिवाशांची अडचण झाल्याची माहिती आरेतील रहिवासी प्रकाश भोईर यांनी दिली.याविषयी एमएमआरसीच्या प्रवक्त्यांना विचारले असता त्यांनी भुयारी मार्ग मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचे सांगतिले. मात्र मेट्रो ३ मार्गिकेच्या कामामुळे पाणी साचल्याच्या प्रश्नावर त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. तर भुयारी मार्ग आणि इतर ठिकाणी पाणी साचल्याबाबत पालिकेच्या अधिकार्यांना संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेत कार्यवाही करु असे सांगितले.
आरे कारशेडमुळे आरेच नव्हे तर मुंबईही पाण्याखाली जाणार आहे हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. ते आता खरे ठरु लागले आहे. कारशेडच्या कामासाठी ओशिवरा आणि मिठी नदीच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षेत्रात भिंती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज आरेतील परिसरात पाणी साचले आहे. याला पूर्णत जबाबदार एमएमआरसी असल्याचा आरोप यानिमित्ताने वनशक्तिचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. तर सर्व भिंती पाडून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्याचवेळी पर्यावरणप्रेमी अम्रिता भट्टाचार्य यांनीही आरेतील पाणी साचण्याला मेट्रो ३ चे च काम जबाबदार असल्याचे म्हणत याविरोधात पालिकेकडे तक्रार केली आहे. तर लवकरच एमएमआरसीकडेही तक्रार करणार असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.