मुंबई : कुख्यात शस्त्र तस्कर सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणेने नेपाळ मधून अटक केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात शस्त्रे पुरविल्याचा सलीमवर संशय आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिष्णोई टोळीने ही हत्या घडवून आणली होती. याप्रकरणात आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एक संशयित सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागला आहे. शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणेने नेपाळमध्ये संयुक्त कारवाई करून सलीम पिस्टल याला ताब्यात घेतले आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी भागवत सिंग याने राजस्थानच्या उदयपूर येथून शस्त्र मुंबईत आणून मारेकऱ्यांना पुरवली होती. मात्र या गुन्ह्यात सलीम पिस्टल याचा सहभाग प्रथमच उघड झाला आहे. त्याने ही शस्त्रे राजस्थानपर्यंत पोहोचवली असल्याचा संशय आहे. त्याच्या अटकेमुळे शस्त्रास्त्रांच्या तस्करीमधील बरीच माहिती समोर येऊ शकणार आहे.
कोण आहे सलीम पिस्टल?
सलीम पिस्टल मागील दोन दशकांपासून गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रीय आहे. वाहन चोरीपासून त्याने गुन्हेगारी कृत्याला सुरवात केली होती. त्यानंतर दरोडा आणि नंतर शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करण्यात तो सक्रीय झाला. सलीम हा पाकिस्तानमधून बेकायदेशीरित्या भारतात हत्यारांची तस्करी करत होता. त्याचे पाक दहशतवादी संघटना तसेच दाऊद टोळीशी संबंध असल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी सलीमला अटक केली होती. तेव्हा जामीन मिळवून तो परदेशात पळून गेला होता. तेव्हा पासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होती.
सिद्दिकी हत्या प्रकरणात किती आरोपी?
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात २६ जणांना अटक करण्यात आली असून ३ आरोपी फरार दाखविण्यात आले आहेत. फरार आरोपींमध्ये अनमोल बिष्णोई, मोहम्मद यासीन अख्तर, शुभम लोणकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोक्का न्यायालयात ४ हजार ५९० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.