लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काळाघोडा महोत्सवाच्या धर्तीवर महोत्सवाचे आयोजन करता यावे यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘बीकेसी आर्ट प्लाझा’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच काम वेगाने सुरू असून सन २०२४ च्या अखेरीस या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे या वर्षाअखेरीस बीकेसीमध्ये कला महोत्सव, प्रदर्शनांचे आयोजन करणे शक्य होणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र अशी बीकेसीची ओळख आहे. या आर्थिक केंद्रात काळाघोडाच्या धर्तीवर महोत्सव, प्रदर्शन भरवता यावे, परिषदांचे आयोजन करता यावे यासाठी एमएमआरडीने ‘बीकेसी आर्ट प्लाझा’ (कला केंद्र) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कालानगर उड्डाणपुलाजवळील नंदादीप उद्यानाच्या दक्षिण दिशेला हे कला केंद्र विकसित करण्यात येत आहे. सुमारे १०५४५.३२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे कला केंद्र उभारण्यात येत आहे. या कला केंद्रात एक रंगमच आणि १०० व्यक्तींसाठी आसन व्यवस्था आदी सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर कलाशिल्प, फुलझाडांनी हे कला केंद्र सजणार आहे. येथे येणारे पर्यटक, मुंबईकरांसाठी खानपान, वाहनतळ, वायफाय, प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-मुंबईत १८ व १९ जानेवारी रोजी मध महोत्सव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कला केंद्राचे काम सन २०२४ च्या अखेरीस पूर्ण करून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे या वर्षाअखेरीस येथे कला महोत्सवाचे आयोजन करणे शक्य होणार आहे. दरम्यान, हे कला केंद्र वांद्रे रेल्वे स्थानकापासून सुमारे ८५० मीटर अंतरावर आहे. तर ‘अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’ तसेच ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकांवरील स्थानके या प्रकल्पापासून नजीक आहे. त्यामुळे या कला केंद्रात पोहचणे पर्यटक, नागरिकांना सोपे होणार आहे.