नगरकरांची पहिली कादंबरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ मुळात १९६७-६८ च्या सुमारास पु. आ. चित्रेंच्या ‘अभिरुची’मधून प्रकाशित झाली होती. त्यावेळीच जाणकार वाचकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. रा. भा. पाटणकर, मे. पुं. रेगे यांच्यासारख्या मान्यवरांनी तिचे कौतुक केले होते. ‘मौज’सारख्या प्रकाशन संस्थेला किंवा खरं तर श्री. पु. भागवतांसारख्या साक्षेपी संपादक- प्रकाशकाला ही कादंबरी विशेष काही बदलांविना प्रकाशित करायला लावण्यामागे या कादंबरीची पाठराखण करणाऱ्या याच ज्येष्ठांचा हात होता. या कादंबरीची मोकळीढाकळी नैसर्गिक शैली, प्रयोगशील रचनाबंध, भारतीय समाजव्यवस्थेत तोवर तरी फारसे स्थान नसलेले व्यक्तिस्वातंत्र्य जपू पाहणारा नायक यांसारख्या गोष्टींमुळे नेमाडे यांची ‘कोसला’, भाऊ पाध्येंच्या मुंबईचं जनजीवन चित्रित करणाऱ्या कादंबऱ्या इत्यादींप्रमाणे नगरकरांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’चाही बोलबाला मराठीत होऊ लागला होता. भालचंद्र नेमाडेंसारख्या समीक्षकानेही या कादंबरीच्या अनुषंगाने बोलताना, संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यातून व्यक्तिमत्त्वहनन करणारी एक भयानक पोकळी निर्माण होते ही जाणीव ज्या कादंबरीकारांना झाली आहे, त्यामध्ये भाऊ  पाध्येंप्रमाणे किरण नगरकरांचाही समावेश होतो, असे म्हटले होते. नेमाडे यांच्याप्रमाणेच अनेक समीक्षकांनी साठोत्तर दशकातील महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये ‘सात सक्कं त्रेचाळीस’चा अंतर्भाव केलेला दिसतो. तरीसुद्धा या कादंबरीच्या मुखपृष्ठावरील कादंबरीच्या आशयसूत्रांचे सूचन करणाऱ्या मजकुरापासून ते त्यातील जाहिरात क्षेत्राप्रमाणे केलेल्या दृश्यात्मकतेचा वापर, भाषेतील मोकळेपणा अशा मराठी अभिरुचीला अपरिचित वाटणाऱ्या अनेक गोष्टींवर टीका झाली आणि नगरकरांनी आपल्या पुढील कादंबऱ्या इंग्रजीत लिहिल्या. किरण नगरकर मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीशी लहानपणापासून परिचित आहेत. ‘सात सक्कं त्रेचाळीस’प्रमाणे ‘रावण आणि एडी’ या कादंबरीमध्येही या चाळीतल्या जीवनवास्तवाचे संदर्भ येतात. मात्र, तरीही मराठी वाचकांचा विशेष ओढा असलेल्या पारंपरिक स्वरूपाच्या मध्यमवर्गीय संवेदनाविश्वला नगरकरांच्या लेखनात फारसं स्थान मिळाले नाही. मध्यमवर्गीय जाणिवा-संवेदनांवर पोसलेल्या मराठी अभिरुचीच्या असे लेखन पचनी पडणे काहीसे कठीणच गेले असावे. मुंबईतील चाळसंस्कृतीशी संबंधित सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसे उभी करतानाही या माणसांचे मानसिक गोंधळलेपण, भावनिक गुंते, लैंगिक वर्तनव्यवहारातील मोकळेपणा ज्या पद्धतीने नगरकर चित्रित करतात, ती पद्धत मराठी वाचकांसाठी पूर्णत: अनोळखी होती.

मराठी साहित्य व समाजव्यवहाराशी संबंधित प्रसारमाध्यमे, संमेलने, चर्चासत्रे, साहित्यिक नियतकालिके, विशिष्ट गट, पंथ, वाद वा भूमिका, लेखनाची विशिष्ट वाचकगटाला आवडेल अशी चाकोरी वा पठडी, खळबळजनक विधाने अशा अनेक गोष्टींपासूनही नगरकर बऱ्यापैकी दूर असल्याने त्यांच्या लेखनाविषयी बहुसंख्य मराठी वाचक अनभिज्ञ राहिला. मौजेसारख्या गंभीर व दर्जेदार प्रकाशनाचे पुस्तक असूनही  ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची पहिली आवृत्ती संपायला सत्तावीस वर्षे लागली.   याउलट, इंग्रजीतून प्रकाशित झालेल्या ‘रावण अण्ड एडी’, ‘ककल्ड’, ‘गॉड्स लिट्ल सोल्जर’, ‘द एक्स्ट्राज’ या कादंबरीचे इंग्रजी, जर्मनसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि त्यांच्या लाखोंनी प्रती संपल्या.

किरण नगरकरांच्या कादंबऱ्यांतील प्रयोगशीलता, लेखनशैलीचे नावीन्य, भारतीय मिथकांमधील काही पात्रांच्या अनुषंगाने नव्या विचार व जाणिवांचा घेतलेला वेध अशा काही मराठी अभिरुचीला न रुचलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाचकाच्या पसंतीला उतरलेल्या दिसतात. विशेषत: नगरकरांच्या कादंबऱ्यांचा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या मूळ मराठीपासून सुरू होत पुढे ‘रावण अ‍ॅण्ड एडी’, ‘ककल्ड’, ‘गॉड्स लिट्ल सोल्जर’ हा आंतरराष्ट्रीय वाचक काबीज करण्याचा हेतू मनात बाळगून केलेला प्रवास पाहिला तर अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात. मराठी मध्यमवर्गीय संवेदनाविश्व ते आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष मूल्य असलेल्या भारतीय मिथकांतील गोष्टी, त्यांचा कालसापेक्ष लावलेला नवा अन्वयार्थ, बोल्ड लैंगिक तपशील, सर्वसामान्य भारतीय मनाला सिनेमाविश्वाचे असलेले आकर्षण या सगळ्यातून मराठी अभिरुचीपेक्षा युरोपियन वाचकांच्या अभिरुचीकडे नगरकरांनी थोडे जास्तच लक्ष पुरवलेले दिसून येते.

प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘किरण नगरकरांचं करायचं काय?’ या ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखावर आधारित