ख्रिश्चन, पाठारेप्रभू ही मंडळी मूळची खोताच्या वाडीतील रहिवाशी. नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या अठरापगड जातीतील अनेकांनी खोताच्या वाडीतील पागडीच्या घरात आश्रय घेतला. मात्र तरीही खोताच्या वाडीतील ख्रिश्चनांच्या बंगल्यांचे वेगळेपण टिकून राहिले. खोताच्या वाडीत फेरफटका मारताना गोव्यात फिरल्याचा भास व्हायचा तो या टुमदार बंगल्यांमुळेच.
सात बेटांच्या मुंबईवर सतराव्या शतकाच्या अखेरच्या काळात पोर्तुगीजांचे आधिपत्य होते. इंग्लंडचा चार्ल्स दुसरा याला पोर्तुगीज राजाने आपली कन्या दिली आणि राजाने मुंबई हुंडा म्हणून चार्ल्स दुसरा याला देऊन टाकली. तत्पूर्वी आताच्या गिरगाव परिसरात पोर्तुगीज शैलीतील काही प्रार्थनास्थळे (चर्च) आणि टुमदार बंगली उभी राहिली होती. आकर्षित अशा लाकडी बांधकामांमुळे ही बंगल्यांची वसाहत मनाला भुरळ पाडणारी अशीच होती. कालौघात या वसाहतीच्या आजूबाजूला मुंबईचे मूळ रहिवाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाठारेप्रभू मंडळींनी छोटय़ा-छोटय़ा चाळी उभ्या केल्या आणि या वसाहतीने हातपाय पसरले. बांधकामाच्या नियोजनाअभावी छोटय़ा-छोटय़ा इमारती एकमेकांना खेटून उभ्या राहिल्या. तर काही इमारतींच्या मध्ये अवघ्या एक-दोन फुटाची मोकळी जागा सोडलेली. त्यामुळे तेथे दाटीवाटीने इमारती उभ्या राहिल्या. देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत गेला आणि ब्रिटिशांनी आपली सत्ता गाजवायला सुरुवात केली. मुंबईस्थित दादोबा वसंत खोत ब्रिटिश सरकारच्या दफ्तरी सेवेत होते. ब्रिटिशांनी त्यांच्यावर या वसाहतीमधील रहिवाशांकडून कर गोळा करण्याची जबाबदारी सोपविली होती. ही जबाबदारी दादोबा वसंत खोत यांनी इमानेइतबारे पार पाडत होते.
ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठय़ा संख्येने तरुण रस्त्यावर उतरू लागले होते. काही तरुण महात्मा गांधीजींचा अहिंसेचा मंत्र जपत, तर काही तरुण क्रांतिकारी मार्गाने ब्रिटिश सरकारविरुद्ध दंड थोपटत होते. अखेर ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. भारतातून जाताना ब्रिटिशांनी सरकारदरबारी इमानेइतबारे चाकरी करणारे दादोबा वसंत खोत यांना ही वसाहत दिली आणि ब्रिटिश भारतातून निघून गेले. त्यानंतर दादोबा वसंत खोत या वसाहतीचे मालक बनले. त्यामुळे या वसाहतीला खोताची वाडी असे नाव पडले, असा इतिहास दादोबांच्या कुटुंबातील आजच्या पिढीतील यतीन खोत यांचे म्हणणे आहे. मात्र खोतांच्या दोन पिढय़ांनंतर ही वसाहत त्यांच्या हातून गेली. ती कशी गेली, याची माहिती खोतांच्या आजच्या पिढीला नाही. पण आजही ही वसाहत खोताची वाडी म्हणूनच परिचित आहे.
मुंबईतील ख्रिश्चन बांधवांच्या वस्त्यांपैकीच ही एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. पूर्वीपासून खोताच्या वाडीत ख्रिश्चन आणि मराठी भाषक असा गोतावळा. त्यामुळे गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळीबरोबरच नाताळही धुमधडाक्यात साजरा होत आला आहे. आजही नाताळाच्या पूर्वसंध्येपासून दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघणारी ख्रिश्चन बांधवांची घरे, घराघरात संगीताच्या तालावर थिरकणारी पावले आणि या उत्साहात रममाण होणारे मराठी बांधव असे वातावरण आजही पाहायला मिळते. ख्रिश्चन बांधव गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दीपोत्सवात मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे अस्सल मराठमोळ्या गिरगावच्या मध्यभागी असलेल्या खोताच्या वाडीने आपली आगळीवेगळी संस्कृती जपली. या खोताच्या वाडीने अनेक कलावंत नाटय़-सिनेसृष्टीला दिले. तसेच साहित्य क्षेत्रातही खोताच्या वाडीतील रहिवाशांनी ठसा उमटविला. त्यापैकीच कॅप्टन मा. कृ. शिंदे, रमेश चौधरी, गणेश सोळंकी, नीलाक्षी पेंढारकर ही मंडळी.
खोताच्या वाडीमध्ये चार ठिकाणांहून प्रवेश करता येतो. व्ही. पी. रोड आणि जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरून प्रत्येकी दोन ठिकाणांहून प्रवेश करता येतो. मात्र एकदा का खोताच्या वाडीमध्ये प्रवेश केला की छोटय़ा-छोटय़ा गल्ल्या, टुमदार बंगले, एकमेकाला खेटून उभ्या असलेल्या एक-दोन मजली चाळी असा पसारा. खोताच्या वाडीची रचना चक्रव्यूहासारखीच म्हणावी लागेल. नवखी व्यक्ती खोताच्या वाडीत गेल्यानंतर या चक्रव्यूहात अडकलीच म्हणून समजा. आतापर्यंत अनेकांना त्याचा अनुभव आलाही आहे.
खोताच्या वाडीतील शानबागांची खानावळ आणि खडप्यांचे अनंताश्रम केवळ गिरगावातील नव्हे, तर मुंबईतील चोखंदळ खवय्यांच्या मनात मानाचे स्थान मिळविले होते. चुलीवर बनविलेले अस्सल गोवन्स पद्धतीचे मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी अनंताश्रमाच्या बाहेर खवय्यांची रांग लागत असे. तर कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी शानबागांची खानावर गर्दीने फुलून जात असे. मात्र कालौघात शानबागांची खानावळ आणि अनंताश्रम बंद झाले आणि चोखंदळ खवय्ये आपल्या पसंतीच्या भोजनाला कायमचे मुकले. मात्र आजही जुने मुंबईकर गिरगावात आल्यानंतर अनंताश्रम आणि शानबागांच्या खानावळीची आवर्जून आठवण काढल्याशिवाय राहात नाहीत. खोताच्या वाडीत मध्यभागी असलेल्या आयडियल वेफर्समधून आजही खमंग वेफर्सचा गंध दरवळतो. खोताच्या वाडीच्या नाक्यावरची डिंगडाँग लायब्ररीने वाचनप्रेमींच्या मनात अढळ स्थान मिळविले आहे. वाचन संस्कृती जपणारी ही लायब्ररी आजघडीला काळाच्या पडद्याआड गेली. मात्र वाचनप्रिय मंडळी आजही या लायब्ररीला विसरू शकलेले नाहीत. खोताच्या वाडीमधील ख्रिश्चन बांधवांचा क्लब गिरगावकरांच्या आकर्षणाचा विषय बनला होता. या क्लबमुळेच गिरगावकरांना बिलियर्डची ओळख झाली. या क्लबमध्ये रंगणारे बिलियर्डचे सामने पाहण्यात गिरगावकर दंग असायचे. सर नारायण चंदावरकर शाळा हीदेखील खोताच्या वाडीचा एक भागच बनली. आजघडीला शाळा बंद झाली आणि विद्यार्थ्यांच्या गजराने गजबजून जाणारी खोताची वाडी नीरव शांत बनली. काही वर्षांपूर्वी खोताच्या वाडीचे ‘आप्पा पेंडसे मार्ग’ असे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या सभागृहात नामकरणाचा ठरावही झाला होता. मात्र खोताच्या वाडीशी अतूट नाते बनलेल्या रहिवाशांनी या नामकरणाला कडाडून विरोध केला. अखेर हा ठराव बारगळला आणि जुनेच नाव आजही कायम राहिले.
छोटय़ा-छोटय़ा बंगल्यांमुळे खोताच्या वाडीला पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे जुन्या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आणि विकासकांची नजर खोताच्या वाडीवरही पडली. खोताच्या वाडीची शोभा वाढविणारे टुमदार बंगले काळाच्या पडद्याआड जाऊ नयेत म्हणून रहिवाशांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र राजकीय वरदहस्ताने काही चाळी आणि बंगल्यांनी कात टाकली. त्यांच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहिले. ख्रिश्चन आणि मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी खोताच्या वाडीमध्ये ‘खोताची वाडी महोत्सव’ही आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांची घरे ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची, तसेच गोव्यातील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मुंबईकरांना मिळाली होती. गोव्याची आठवण करून देणाऱ्या खोताच्या वाडीचे मूळ स्वरूप जपण्याकडेच रहिवाशांचा कल आहे.
– प्रसाद रावकर
prasadraokar@gmail.com